मुंबई : यंदाच्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी १२ टक्क्यांनी घसरून ११५.६ टनांवर आली, असे जागतिक सोने परिषदेने (डब्ल्यूजीसी) म्हटले आहे.
‘२0१८ च्या पहिल्या तिमाहीतील सोने मागणी कल’ या अहवालात सोने परिषदेने म्हटले की, जानेवारी ते मार्च २0१८ या तिमाहीत भारताची सोने मागणी ११५.६ टन राहिली. आदल्या वर्षी ती १३१.२ टन होती. मूल्यानुसार, या तिमाहीत भारताची सोने मागणी ८ टक्क्यांनी घसरून ३१,८00 कोटी रुपयांवर आली. गेल्या वर्षी याच काळात ती ३४,४४0 कोटी रुपये होती.
जागतिक सोने परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी सांगितले की, स्थानिक बाजारातील सोन्याच्या वाढत्या किमती, गेल्या वर्षाच्या तुलनेत लग्नतिथीत झालेली लक्षणीय घट आणि केंद्रीय अर्थसंकल्पात आयात कर लावला जाणार असल्याचा अंदाज यामुळे भारताची सोने मागणी घटली आहे. जीएसटीमधील संक्रमणाचाही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे व्यावसायिक धारणा कमजोर झालेली होती. अक्षयतृतीयेपर्यंत ती कमजोरच राहिली. याचाही परिणाम दिसून आला. अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी १२ टक्क्यांनी घसरून ८७.७ टनांवर आली. गेल्या वर्षी ती ९९.२ टन होती. मूल्यानुसार दागिन्यांची मागणी ७ टक्क्यांनी घसरून २४,१३0 कोटी रुपयांवर आली. आदल्या वर्षी ती २६,0५0 कोटी रुपये होती.
सोन्याची गुंतवणूक मागणी १३ टक्क्यांनी घटून २७.९ टनांवर आली. आदल्या वर्षी ती ३२ टन होती. मूल्यानुसार, पहिल्या तिमाहीतील सोन्याची गुंतवणूक ९ टक्क्यांनी घसरून ७,६६0 कोटी रुपये झाली. २0१७ मध्ये ती ८,३९0 कोटी रुपये होती.
भारताची सोन्याची मागणी १२ टक्क्यांनी घटली
यंदाच्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी १२ टक्क्यांनी घसरून ११५.६ टनांवर आली, असे जागतिक सोने परिषदेने (डब्ल्यूजीसी) म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:37 AM2018-05-04T05:37:38+5:302018-05-04T05:37:38+5:30