नवी दिल्ली : सोन्याच्या किमती पाच वर्षांच्या उच्चांकावर गेल्या असतानाही गेल्या महिन्यातील भारताची सोने आयात तब्बल ६४ टक्क्यांनी वाढली. ज्वेलरांकडून लग्नसराईसाठी सोन्याचा साठा करून ठेवण्यात येत असल्यामुळे आयातीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या जानेवारीत ४६ टन सोन्याची आयात झाली. आदल्या वर्षाच्या तुलनेत ती ६४ टक्क्यांनी अधिक आहे. अधिक किमतीमुळे आयातीवर थोडीशी मर्यादा आली आहे. डिसेंबरमध्ये ६० टन सोन्याची आयात झाली होती. भारतात वधूला सोन्याचेदागिने घालणे शुभ समजले जाते. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते.या महिन्यात लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढेल. मे महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त सोने खरेदीचा दुसरा मोठा दिवस समजला जातो.यंदा मे महिन्यात निवडणुकाही आहेत. त्यामुळे भारतातील सोन्याची मागणी यंदा वाढलेली असेल, असे लंडनस्थित जागतिक सोने परिषदेने म्हटले आहे.इंडिट्रेड डेरिव्हेटिव्हज अॅण्ड कमॉडिटीजचे प्रमुख हरीश गलीपेल्ली यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ग्रामीण भागाच्या उत्पन्नात घट झाली होती. रुपया घसरल्यामुळे सोने आयात महाग झाली होती. त्यामुळे आयात नरम राहिली होती.यंदाच्या हंगामात सोने खरेदी वाढणारपरिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम् यांनी गेल्याच महिन्यात म्हटले होते की, निवडणुका म्हणजे खर्च. उत्पन्नाचे फेरवितरण निवडणुकांत होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोने खरेदी वाढणार आहे. निवडणुकांमुळे बाजारात पैसा येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात सवलतींची उधळण करून याची चुणूक दाखवून दिली आहे. सरकार शेतकºयांना ७५० अब्ज रुपये वितरित करणार आहे, तसेच करदात्यांना १८५ अब्ज रुपयांची कर सवलत देणार आहे.
भारताची सोने आयात ६४ टक्क्यांनी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:44 AM