हाँगकाँग : परदेशी गुंतवणुकीने भारतातील पायाभूत सेवा आणि अन्य क्षेत्रांना खूपच अतिरिक्त संसाधने मिळू शकतात. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत भारत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे स्पष्ट केले.उद्योग जगतातील नेते आणि गुंतवणूकदार यांच्या एका बैठकीत संबोधित करताना जेटली म्हणाले की, सरकार देशातील व्यवसायाच्या सुसूत्रतेवर लक्ष देत आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेने उत्पादन क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. देशाच्या पायाभूत क्षेत्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. रेल्वे, रस्ते आणि वीज क्षेत्रासाठी प्रचंड पैशाची आवश्यकता आहे. या प्रकल्पाचे यश बँकांच्या क्षमतेवर अवलंबून आहे.जेटली यांनी दोन दिवस सिंगापुरात सरकारी नेते आणि खाजगी गुंतवणूकदार यांच्यासह दोन दिवस चर्चा केली. आता ते दोन दिवस हाँगकाँगमध्ये आले आहेत. त्यांच्या सोबत मुंबई शेअर बाजाराचे प्रमुख आशिषकुमार चौहान यांच्यासह मोठे व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे.भारतात गुंतवणुकीची प्रक्रिया खूपच किचकट आहे, असे यापूर्वी गुंतवणूकदारांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर जेटली म्हणाले की, एकूणच गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आम्ही ध्यान देत आहोत. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ हे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. काही राज्यांनी विजेचा दर समाधानकारक ठेवला नाही, त्यामुळे वीज कंपन्या अडचणीत आल्या आहेत. हा तोटा सरकार भरून देईल, अशी आशा या राज्यांनी करू नये. अनेक वीज कंपन्यांपुढे प्रचंड आर्थिक संकट आहे. सरकारी बँकांना मजबूत करण्यावर सरकारचे सर्वोच्च लक्ष आहे, असे सांगून ते म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या काही दुर्बल बँकांचे मजबूत बँकेत विलीनीकरण केले जाऊ शकते.
गुंतवणुकीवर भारत देणार चांगला परतावा : जेटली
By admin | Published: September 20, 2015 11:08 PM