वॉशिंग्टन : वित्त वर्ष २०१९-२० मध्ये भारताचा वृद्धिदर घसरून ५ टक्के होण्याची शक्यता आहे, असे जागतिक बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. त्यापुढील वित्त वर्षात तो वाढून ५.८ टक्के होईल, असेही अहवालात म्हटले आहे. भारत सरकारने मंगळवारी जारी केलेल्या डाटामध्येही चालू वित्त वर्षात भारताचा जीडीपी वृद्धिदर ११ वर्षांच्या नीचांकावर जाऊन ५ टक्के होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. जागतिक बँकेनेही असाच अंदाज आता दिला आहे.जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या ‘जागतिक आर्थिक अंदाज’ या अहवालात म्हटले आहे की, भारतातील बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्जातील नरमाई कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतातील वृद्धिदर २०१९-२० मध्ये घसरून ५ टक्के होण्याची शक्यता आहे. त्यापुढील वर्षात मात्र तो थोडासा वाढून ५.८ टक्के होईल. बिगर बँकिंग कर्जातील घसरगुंडीचा परिणाम होऊन भारतातील देशांतर्गत मागणी घटली आहे. अपुरी कर्ज उपलब्धता व खासगी मागणीतील नरमाईमुळे आर्थिक घडामोडी संकोचल्या आहेत. वित्तीय क्षेत्रातील या तणावाचा परिणाम म्हणून प्रामुख्याने भारतीय वृद्धी ५ टक्क्यांवर घसरणार आहे.जागतिक बँकेने म्हटले की, भारतात २०१९ मध्ये आर्थिक घडामोडी लक्षणीयरीत्या मंदावल्या आहेत. वस्तू उत्पादन आणि कृषी क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. वास्तविक, या क्षेत्रात सरकारी खर्चाचा चांगला आधार मिळाला आहे. तरीही मंदीचा प्रभाव दिसून येत आहे. >६ टक्क्यांसाठी २0२0 उजाडेल‘जागतिक आर्थिक अंदाज’ या अहवालात जागतिक बँकेने म्हटले की, आशियातील विभागीय वृद्धी हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. मागणीत वाढ झाल्यानंतर २०२२ मध्ये ती६ टक्के होऊ शकते.
भारताचा वृद्धिदर ५ टक्क्यांवर घसरणार; जागतिक बँकेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 2:53 AM