नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीतील जुलै- सप्टेंबरमध्ये सकल घरगुती उत्पादना(GDP Growth Rate)च्या दरात मोठी घसरण होऊन तो 4.5 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सुस्तावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तत्पूर्वी तिमाहीत जीडीपीचा दर 5 टक्क्यांच्या स्तरावर होता. गेल्या 26 तिमाहीतला हा सर्वात मोठा नीचांक आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर 5 टक्क्यांवर आला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षातल्या तिमाहीतील विकासदर 7 टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.2018-19 या आर्थिक वर्षातील वित्तीय तूट 5.8 टक्के होती. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही तूट 6.4 टक्के होती, अशी आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालात आहे. 2025पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनच्या घरात जाईल, अशी घोषणा सरकारनं केली. त्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग 8 टक्के इतका असायला हवा, असं आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. जागतिक मंदीमुळे भारताच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच जीडीपी घसरल्याचं म्हटलं जातंय.जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी घसरला होता. त्यावरदेखील आर्थिक पाहणी अहवालातून बोट ठेवण्यात आलं होतं. बुडीत खात्यात गेलेली कर्जे ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र या कर्जांचं प्रमाण कमी झाल्यानं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु आता जीपीडी घसरल्यानं हा अर्थव्यवस्थेला मोठा झटका आहे.
भारताच्या GDPमध्ये नीचांकी घसरण, विकासदर 4.5 टक्क्यांवर स्थिरावला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:59 PM