Manufacturing PMI : गेल्या २ आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने अनेक विक्रम प्रस्थापिक केलेत. बाजाराची कामगिरी पाहिली तर भारतीय अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे सांगायला कुणा तज्ञाची गरज पडणार नाही. मात्र, भरभराट होत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मार्गात अचानक एक मोठा अडथळा दिसत आहे. औद्योगिक क्षेत्राबाबत जाहीर करण्यात आलेली सप्टेंबरची आकडेवारी धोक्याची घंटा तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या क्षेत्रात कारखान्यातील उत्पादन ८ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आले आहे. एचएसबीसी इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
HSBC इंडियाच्या मासिक सर्वेक्षण अहवालानुसार, कारखाना उत्पादन, विक्री आणि नवीन निर्यात ऑर्डर मंदावली आहे. परिणामी सप्टेंबरमध्ये भारतातील उत्पादन क्षेत्रातील कामगिरी ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्टमध्ये ५७.५ होता, सप्टेंबरमध्ये तो घसरुन ५६.५ वर आला आहे. PMI नुसार, निर्देशांक ५० च्या वर असेल तर उत्पादन घडामोडींचा विस्तार, तर ५० पेक्षा कमी आकडा घट दर्शवतो.
नवीन ऑर्डर दीड वर्षातील सर्वात कमीएचएसबीसीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ (भारत) प्रांजुल भंडारी म्हणाले, 'उन्हाळी हंगामात जोरदार वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये देशाचे उत्पादन क्षेत्र मंदावले. उत्पादनाची मंद गती आणि नवीन ऑर्डर आणि निर्यात मागणी वाढ मंदावली होती. कारण नवीन निर्यात ऑर्डर्स PMI मार्च २०२३ पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.'
संपूर्ण देशावर परिणामसप्टेंबरच्या पीएमआय डेटानुसार, संपूर्ण भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीमध्ये थोडीशी घट झाली आहे. कारखाना उत्पादन आणि विक्रीतील वाढीचा दर सलग तिसऱ्या महिन्यात घसरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ऑर्डर दीड वर्षातील सर्वात कमी वेगाने वाढल्या आहेत. HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय एस अॅण्ड पी ग्लोबलने सुमारे ४०० कंपन्यांच्या समूहातील खरेदी व्यवस्थापकांना पाठवलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या आधारे तयार केले आहे.
रोजगारावर होईल परिणामसप्टेंबर महिन्यातील उत्पादन क्षेत्रातील घट ही चिंतेचा विषय आहे. पीएमआय निर्देशांक ५० च्या वर असला तरी तो गेल्या ८ महिन्यातील निच्चांकी आहे. ही तूट भरुन निघणे महत्त्वाचे आहे. कारण, उत्पादन क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या क्षेत्रातील अशीच घट सुरू राहिली तर भविष्यात सर्वसामान्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम होईल. रोजगाराच्या संधीही कमी होण्याची भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.