Join us

गेल्या काही वर्षांतील नोकऱ्यांची मागणी पाहता सुरू असलेली वाढ अपुरी - रघुराम राजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 12:59 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

जागतिक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. महागाई गगनाला भिडत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. “गेल्या काही वर्षांत भारतात ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची (Jobs) गरज वाढली आहे, त्यासाठी सध्या सुरू असलेली वाढ अपुरी आहे. आपल्या लोकांचं शिक्षण आणि कौशल्य आपल्याला वाढवावं लागेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

जगातील अनेक अर्थव्यवस्थांपेक्षा आपली अर्थव्यवस्था निश्चितच अधिक विकसनशील आहे. आपल्याला कोणत्या स्तरावरील वृद्धीची आवश्यकता आहे हा प्रश्न असल्याचे रघुराम राजन म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी वाढली आहे, त्यासाठी ही वाढ अपुरी आहे. आपण आराम करू शकतो का? तर बिलकुलग नाही. आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे, आपल्याला अधिक विकासाची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“आपल्या लोकांचं शिक्षण आणि कौशल्य आपल्याला वाढवायचे आहे. पुढच्या १० वर्षांत शाळा सोडणाऱ्या आणि पदवीधर होणार्‍या पिढीसाठी मोठा धोका आहे. जर आपण स्किल बेस तयार करू शकलो तरच नोकऱ्या येतील, असंही रघुराम राजन म्हणाले. यावेळी त्यांनी घसरणाऱ्या रुपयाबाबतही आपली प्रतिक्रिया दिली. एकदा महागाई नियंत्रणात आली की, आपल्या निर्यातीची पातळी पाहता रुपया त्याच्या पातळीवर पोहोचेल. सर्वसाधारणपणे, किमान पुढे पाहताना, महागाई कमी होईल अशी आशा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :रघुराम राजनअर्थव्यवस्थानोकरीभारत