नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे सावट असतानाच मूडीज या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा स्थैर्याचा (स्टेबल) हा दर्जा काढून घेतला असून, आता नकारात्मक (निगेटिव) हा खालच्या स्थानी ढकलले आहे. भारताच्या विकासाचा आणि आर्थिक सुधारणांचा दर पुढील काही काळ संथ राहील, अशी शक्यताही मूडीजने व्यक्त केली आहे. फिच व एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या संस्थांनी मात्र अद्याप स्थिर अर्थव्यवस्था याच गटात भारताला ठेवले आहे.
आर्थिक मंदीशी सामना करण्यासाठी भारताने धोरणे आखली, पण त्यांची नीट अंमलबजावणी मात्र झाली नाही, त्यामुळेच मूडीजने अर्थव्यवस्थेचा दर्जा नकारात्मक करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन उद्योगातील मंदी, रिटेल व्यवसायात होत असलेली घट, घरांना नसलेली मागणी आणि मोठे उद्योग अडचणीत येणे या साऱ्याला नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट्सची आर्थिक चणचण हे कारण असल्याचा उल्लेख मूडीजने केला आहे. भारतात अशा वातावरणात अपेक्षेप्रमाणे गुंतवणूक होत नसल्याचेही मूडीजने म्हटले आहे. कॉपोर्रेट करात करण्यात आलेली कपात तसेच जीडीपीचा कमी झालेला वेग यांमुळे या आर्थिक वर्षाअखेरीसमार्च अर्थसंकल्पीय तूट ३.७ टक्क्यांपर्यंत जाईल, असेही मूडीजने म्हटले आहे. सरकारने अर्थसंकल्पीय तुटीचे लक्ष्य ३.३ टक्के ठेवले होते. गेल्याच महिन्यात मूडीजने भारताचा जीडीपीच्या अंदाजातही घट केली होती. आधी मूडीजने जीडीपी ६.२ टक्के असेल, असे म्हटले होते. पण आॅक्टोबरमध्ये तो ५.८ टक्के इतका असेल, असा अंदाज मूडीजने व्यक्त केला. आधीच्या तुलनेते भारताची अर्थव्यवस्था संथ गतीने पुढे सरकेल, अशी शक्यता मूडीजने व्यक्त केली असून, भारतावरील कर्जाचा बोजा पुढील काळात वाढत जाण्याची भीतीही निवेदनात नमूद केली आहे.
भारताने फेटाळले मुद्दे
भारताने मूडीजचा हा दावा फेटाळून लावला आहे. कॉर्पोरेट करातील कपातीमुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता असली तरी त्यामुळे उद्योगांना चांगले दिवस येतील आणि त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल, मागणी वाढेल, असे भारताचे म्हणणे आहे. वाहन उद्योगाला तसेच घरबांधणी क्षेत्राला दिलेल्या पॅकेजचा सकारात्मक परिणाम दिसेल, याची खात्री भारताने व्यक्त केली आहे. तसेच गुंतवणूक वाढावी, यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात भारताला यश येत आहे, असा दावा भारतातर्फे करण्यात आला आहे.