नवी दिल्ली : भारताचा पासपोर्ट मजबूत झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ५ स्थानांची वाढ झाली आहे. आता देशातील नागरिक ५७ देशांमध्ये व्हिसाशिवाय मुक्तपणे फिरू शकतात. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index) क्रमवारीत भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे, जो २०२२ मध्ये जाहीर झालेल्या अहवालापेक्षा ५ स्थानांनी वर आहे.
भारताचे सध्याचे रँकिंग टोगो आणि सेनेगलसारख्या देशांच्या समान स्तरावर पोहोचले आहे. या रँकिंगची आकडेवारी इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून घेण्यात आली आहे. आता भारतीय नागरिकांना ५७ देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल अॅक्सेस मिळाला आहे. म्हणजेच पासपोर्ट घेऊन तुम्ही जगातील ५७ देशांमध्ये फिरू शकता. तिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा लागणार नाही. काही देशांमध्ये गरज भासली तरी विमानतळावर पोहोचताच व्हिसा सुपूर्द केला जाईल.
कोणत्या देशात जाऊ शकता?
भारतीय नागरिक आता फक्त पासपोर्टचा वापर करून इंडोनेशिया, थायलँड, रवांडा, जमैका, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये प्रवास करू शकतात. दरम्यान, भारतीयांना १७७ देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी अद्याप व्हिसाची आवश्यकता असणार आहे. या देशांमध्ये चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि युरोपीय संघातील सर्व देशांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांना या देशांमध्ये व्हिसासाठी अर्ज करावा लागेल, परंतु काही देश तेथे पोहोचल्यावर विमानतळावरच हा व्हिसा उपलब्ध करून देतात.
आता पहिल्या क्रमांकावर कोण?
यावेळी जाहीर झालेल्या निर्देशांकात अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर असलेल्या जपानची घसरण झाली आहे. सिंगापूरने आता जपानची जागा घेतली असून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. जपान आता जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट राहिलेला नाही. सिंगापूरला हा ताज मिळताच तेथील नागरिकांना व्हिसाशिवाय जगातील १९२ देशांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अहवालात २२७ देश आणि १९९ पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे.
जपानचा गेली ५ वर्षे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट होता
आशियाई देश जपानचा पासपोर्ट गेली ५ वर्षे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट राहिला. यावेळी जाहीर झालेल्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दशकभरापूर्वी या यादीत अव्वल असलेली अमेरिका आता ८ व्या क्रमांकावर घसरली आहे. ब्रेक्झिटनंतर घसरलेला यूके आता दोन स्थानांनी वर चढून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत सर्वात तळाशी अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचे नागरिक २७ देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.