लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताची आर्थिक वृद्धी जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही उपयुक्त आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी शुक्रवारी केले. कोविड लसीच्या माध्यमातून भारत जगाला मदतच करीत आहे, असेही गोपीनाथन यांनी सांगितले.
गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, आपल्या क्रयशक्तीच्या माध्यमातून भारताचे जगाच्या जीडीपीतील योगदान सात टक्के आहे. एवढ्या मोठ्या देशात जे काही घडते, त्याचे परिणाम जगातील इतर देशांवरही होतच असतात. विशेषत: विभागातील देशांवर ते अधिकच होतात. भारताच्या उच्च वृद्धिदराचे चांगले परिणाम त्यामुळे जगाच्या इतर भागांत होतील. गोपीनाथ यांनी सांगितले की, भारताचा वृद्धिदर साधारणत: सहा टक्के आहे. तथापि, कोविडच्या साथीचा फटका बसून चालू वित्त वर्षात भारताचा वृद्धिदर आठ टक्क्यांनी घसरला आहे. २०२१-२२ वित्त वर्षात भारताचा वृद्धिदर ११.५ टक्के राहील. भारताची वृद्धी वेगवान होते, तेव्हा तेथील नागरिकांकडून वस्तूंची खरेदी वाढते. त्याचा सकारात्मक परिणाम जगाच्या इतर भागावरही होतो.