Join us

महागाईच्या भडक्याचा भारताच्या विकासदराला झटका, GDP मध्ये पुन्हा घट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 6:32 PM

India Q3 GDP Data : वाढत्या महागाईमुळे भारताच्या विकासाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

India Q3 GDP Data : वाढत्या महागाईमुळे भारताच्या विकासाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ४.४ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे, कोअर सेक्टरनं सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. खते, कोळसा आणि वीज उत्पादनात तेजी आली आहे.

मंगळवारी सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ४.४ टक्क्यांवर घसरला. सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसर्‍या तिमाहीत स्थिर किंमतींवर GDP ४०.१९ लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ च्या तिसर्‍या तिमाहीत ३८.५१ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

२०२२-२३ च्या तिसर्‍या तिमाहीत GDP ६९.३८ लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ च्या तिसर्‍या तिमाहीत ६२.३९ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ११.२ टक्के वाढ दर्शवते. आकडेवारीनुसार, FY23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी, आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक वाढ पूर्वीच्या ८.७ टक्क्यांवरून ९.१ टक्क्यांवर इतकी सुधारित करण्यात आली आहे. 

कोअर सेक्टरला तेजीवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जारी केलेल्या माहितीनुसार, भारताचा जानेवारीसाठी आठ प्रमुख उद्योगांचा एकत्रित निर्देशांक (ICI) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. सरकारी आकडेवारी सांगते की एप्रिल-जानेवारी २०२२-२३ साठी IIP ७.९ टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारी २०२२ च्या निर्देशांकाच्या तुलनेत जानेवारी २०२३ मध्ये आठ प्रमुख उद्योगांचा एकत्रित निर्देशांक (ICI) ७.8 टक्के (तात्पुरती) वाढला. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये समाविष्ट केलेल्या वस्तूंच्या वजनाच्या ४०.२७ टक्के आठ प्रमुख उद्योगांचा समावेश आहे. जानेवारी २०२३ मध्ये खते, कोळसा, वीज, पोलाद, नैसर्गिक वायू, सिमेंट आणि रिफायनरी उत्पादनांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढले आहे.

टॅग्स :निर्मला सीतारामनव्यवसाय