नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मानक संस्था एस अँड पीने भारताचे ‘बीबीबी-’ हे मानांकन कायम ठेवले आहे. आगामी दोन वर्षांत तरी भारताच्या मानांकनात वाढ होणार नाही, असे एस अँड पीने म्हटले आहे. ‘बीबीबी-’ हे मानांकन सर्वांत कमी गुंतवणूक दर्जा दर्शविते.
एसअँडपीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थैर्य, मजबूत बाह्यस्थिती आणि समावेशक धोरण परंपरा ही भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थाने असली, तरी अल्प दरडोई उत्पन्न आणि कमजोर सार्वजनिक वित्तीय स्थिती, यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कमजोरच आहे. अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती पाहता, आम्ही भारताचे सध्याचे मानांकन बदलावे, असे अपेक्षित नाही. यंदासाठी आणि पुढील वर्षासाठीही भारताचे मानांकन कायम ठेवण्यात येत आहे.
एसअँडपीने म्हटले की, भारताने आपली वित्तीय कामगिरी सुधारली आणि सरकारचे सामान्य कर्ज सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ६0 टक्क्यांच्या खाली आणले, तरच मानांकन सुधारण्यासाठी दबाव येऊ शकेल. सध्या सरकारचे कर्ज जीडीपीच्या ६९ टक्के आहे. मोठी वित्तीय तूट, कर्जाचे ओझे आणि अल्प दरडोई उत्पन्न या चिंतेच्या बाबी आहेत.
>सरकारकडून ‘एसअँडपी’वर टीकास्त्र
भारताच्या मानांकनात सुधारणा करण्यास नकार देणाऱ्या एसअँडपीच्या निर्णयावर भारत सरकारने प्रखर टीका केली आहे. अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले की, एसअँडपीने आत्मपरीक्षण करायला हवे. भारताला कमी दर्जाचे मानांकन मिळाले असल्याचे जगातील गुंतवणूकदारांना वाटते. भारताचे मानांकन सुधारले नाही, म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. तथापि, गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जो विचार करीत आहेत, त्याच्याशी मानांकन जुळणारे नाही.
त्यामुळे जे मानांकन देत आहेत, त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याचा अर्थ आम्ही मानक संस्थेच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहोत, असे नव्हे. त्यांच्या अहवालाचा आम्ही अभ्यास करू.
>एसअँडपीच्या अंदाजानुसार, २0१६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.९ टक्के दराने वाढेल.
>भारताची चालू खात्यातील तूट (आयात निर्यातीतील तूट) जीडीपीच्या १.४ टक्के राहील.
>सप्टेंबर २0१४ मध्ये एसअँडपीने भारताच्या मानांकनात सुधारणा केली होती. ‘नकारात्मक’ असलेले मानांकन ‘स्थिर’ करण्यात आले होते.
भारताच्या मानांकनात दोन वर्षे वाढ अशक्य
आंतरराष्ट्रीय मानक संस्था एसअँडपीने भारताचे ‘बीबीबी-’ हे मानांकन कायम ठेवले आहे.
By admin | Published: November 3, 2016 06:01 AM2016-11-03T06:01:00+5:302016-11-03T06:01:00+5:30