बीजिंग : २०१५ या मावळलेल्या वर्षात भारताची चीनसोबतची व्यापार तूट ४४.८८ अब्ज डॉलरपर्यंत गेली. विशेष म्हणजे या काळात दोन्ही देशांतील व्यापारात किरकोळ वाढ होऊन तो ७१.६४ अब्ज डॉलरपर्यंत गेला. दोन्ही देशांच्या नेत्यांनी १०० अब्ज डॉलरपर्यंत व्यापार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले असले तरीही ते त्यापेक्षा खूपच कमी आहे.चीनच्या सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या आकडेवारींचा हवाला देऊन अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१५ मध्ये भारत-चीन यांचा व्यापार ७१.६४ अब्ज डॉलर झाला. २०१४ मध्ये दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापार ७०.५९ अब्ज डॉलर झाला होता. २०१५ या वर्षातच चीनची निर्यात वाढून ५८.२५ अब्ज डॉलर, तर भारताची निर्यात १३.३८ अब्ज डॉलर झाली. चीनमधील मंदीसोबतच निर्यातीवरील निर्बंधाने मागणी कमी होत आहे. त्यामुळे भारताची निर्यातही सतत घटत आहे. त्याचबरोबर डॉलरचे मूल्य वाढत चालल्याने निर्यातीतून होणाऱ्या फायद्यावरही परिणाम होत असल्याचे भारतीय निर्यातदारांचे म्हणणे आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर दोन्ही देशांतील अनधिकृत व्यापारातील तूट ४८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
भारताची चीनसोबतची व्यापार तूट वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 2:06 AM