मुंबई : भारत व कझाकिस्तानमध्ये द्विपक्षीय संबंध चांगले असून, हे संबंध वृद्धिंगत करण्यास प्राधान्य देणार असून, दोन्ही देशातील व्यापारात वाढवण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही कझाकिस्तानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली. राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुंबई भेट होती. सध्या दोन्ही देशातील व्यापार १.३ कोटी डॉलर्सचा आहे. त्यामध्ये यंदा वाढ होऊन व्यापार १.५ कोटी डॉलर्सपर्यंत वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कझाकिस्तानमधील अलमाटी शहराला मुंबईशी थेट विमानसेवेने जोडण्यात येणार असून एप्रिल २०२० पर्यंत थेट विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईपाठोपाठ गुजरातमध्ये जाऊन संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई भेटीत राजदूतांनी सीआयआय, फिक्की यांच्याशी व्यापारविषयक चर्चा केली. भारत सरकारसोबत सध्या ५ विविध संयुक्त समित्यांद्वारे काम सुरू असून, ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टिक विषयाच्या समितीची या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या ट्रेड व बिझनेस, टेक्स्टाईल, आयटी, मिलिटरी टेक्नॉलॉजी व सायन्स आणि टेक्नॉलॉजी या पाच विषयांवर संयुक्त समित्या अस्तित्वात आहेत. पुढील वर्षी भारतात कझाकस्तानचे अध्यक्ष भेट देऊन दोन देशातील संबंध अधिक चांगले करण्याबाबत पावले उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मानद वाणिज्यदूत महेन्द्र संघी, कझाक इन्व्हेस्टच्या भारतातील संचालिका ऐगुल नुरालीना उपस्थित होत्या. नुरालीना यांनी कझाक इन्व्हेस्टच्या माध्यमातून गुंतवणूक वाढवण्याबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.राज्यपालांची भेटकझाकिस्तानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बुधवारी राज भवन येथे भेट घेतली. यावेळी कझाकस्तानचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेन्द्र संघी, कझाक इन्व्हेस्टच्या भारतातील संचालिका ऐगुल नुरालीना उपस्थित होते.राज्यातील सत्ता संघर्षामध्ये राजदूतांना उत्सुकताराज्याच्या विधानसभेची निवडणूक होऊन पंधरवडा उलटल्यानंतरही अद्याप सत्ता स्थापन होऊन नवीन सरकार अस्तित्वात आलेले नाही. याबाबत सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कझाकस्तानच्या राजदूतांना देखील त्यामध्ये उत्सुकता असल्याचे त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
भारत-कझाकिस्तानमधील व्यापार यंदा १.५ कोटी डॉलर्स होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:30 PM