नवी दिल्ली : एप्रिलमध्ये भारताची वनस्पती तेलाची आयात तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात ८.३२ लाख टन तेलाची आयात भारताने केली. कच्चे पामतेल आणि कच्च्या सॉफ्ट तेलाच्या आयातीत मोठी वाढ झाल्याने तेलाची एकूण आयात वाढली आहे. औद्योगिक संघटना ‘सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन’ने (एसईए) ही माहिती आज जारी केली. एसईएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ६.५४ लाख टन वनस्पती तेलाची आयात झाली होती. भारतात वनस्पती तेलाची वार्षिक मागणी सरासरी १.७ ते १.८ कोटी टन आहे. यातील तब्बल ६0 टक्के तेल आयात करावे लागते. आयात तेलापैकी ८0 टक्के हिस्सा पामतेलाचा असतो. भारतीय खाद्यतेल रिफायनिंग कंपन्या आतापर्यंत कच्च्या पामतेलाच्या आयातीला प्राधान्य देत होत्या. मात्र, आता कंपन्यांनी आयात पॅटर्न थोडा बदलला आहे. कच्चे सॉफ्ट तेलही आता मोठ्या प्रमाणात आयात होऊ लागले आहे. सॉफ्ट तेलामध्ये सोयाबीन, सूर्यफूल आदी तेलांचा समावेश होतो. यंदा कंपन्या सॉफ्ट तेलाच्या आयातीला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १.३९ लाख टन सॉफ्ट तेल आयात झाले होते. यंदाच्या एप्रिलमध्ये हा आकडा २.८३ लाख टन झाला आहे. पामतेलाच्या आयातीत ७.४५ टक्क्यांची घट झाली आहे. एसईएने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ५0 लाख टन सोयाबीन तेल आयात झाले होते. यंदाच्या एप्रिलमध्ये १.१३ लाख टन सोयाबीन तेल आयात झाले आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये ८८,३६८ लाख टन सूर्यफूल तेल आयात झाले होते, ते यदांच्या एप्रिलमध्ये १.७0 लाख टन आयात झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताची वनस्पती तेलाची आयात २७ टक्क्यांनी वाढली
By admin | Published: May 15, 2014 3:44 AM