मुंबई - देशात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यात महिलांची संख्या वेगाने वाढत आहे. विविध राज्यातील महिलांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून त्यासाठी अनेक कारणे आहेत. कामात चांगली संधी मिळणे, पार्टनरशिप वाढणे यामुळे महिलांचे उत्पन्न वाढत आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीतून हा खुलासा झाला. त्यात विशेष म्हणजे आयटी रिटर्न फाईल करण्यात महाराष्ट्रातील महिला देशात एक नंबरला असून २०२३-२४ या वर्षात राज्यातील तब्बल ३६.८ लाख महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे.
या आकडेवारीत महाराष्ट्रानंतरगुजरातचा नंबर लागतो. गुजरातमध्ये २२.५ लाख महिलांनी आयटी रिटर्न फाईल केला आहे. तिसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश असून त्याठिकाणी २०.४ लाख महिलांनी आयटीआर फाईल केला आहे. मागील ५ वर्षात रिटर्न फाईल करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील महिला पुढे येत आहेत. २०१९-२० या काळात १५.८ लाख महिलांनी आयटी रिटर्न फाईल केला होता तर २०२३-२४ या काळात यात २९ टक्क्यांनी वाढ होत २०.४ लाख महिलांनी आयटी रिटर्न भरला आहे. TOI नं याबाबत वृत्त दिलं आहे.
तर कर्नाटकात २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यातील १४.३ लाख महिलांनी आयटी रिटर्न भरला आहे. हा आकडा ५ वर्षापूर्वी २०१९-२० या वर्षात ११.३ लाख महिलांच्या तुलनेत २६ टक्क्यांनी जास्त आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसार आयटीआर भरणाऱ्या महिलांच्या संख्येत सर्वाधिक वेग तेलंगणातील महिलांचा दिसतो. त्याठिकाणी ५ वर्षात ३९ टक्के आयटीआर भरणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. आयटीआर भरणाऱ्यांमध्ये दिल्लीतील महिला खूप मागे आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशाची राजधानी दिल्लीत १२.०८ लाख महिलांनी आयटीआर भरला आहे. मागील ५ वर्षात रिटर्न फाईल करणाऱ्या महिलांची संख्या दिल्लीत केवळ ११ टक्क्यांनी वाढली आहे. लडाखसारख्या केंद्रशासित प्रदेशात महिला करदात्यांची संख्या कमी आहे. तिथे २०१९-२० या काळात केवळ ३० महिलांनी आयटीआर भरला तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही संख्या सात पटीने वाढून २०५ इतकी झाली आहे. चंदीगड येथेही महिला करदात्यांची संख्या घटली आहे. याठिकाणी २०१९-२० काळात ८९८७३ महिलांनी आयटीआर भरला तर २०२३-२४ या काळात ८८,११५ महिलांनी आयकर रिटर्न भरला आहे.