Adani Group News Update: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. तर दुसरीकडे रेटिंग एजन्सीनंही कंपन्यांचं रेटिंग कमी केलं होतं. इतकंच नाही तर राजकीय वर्तुळातही याचे परिणाम दिसले होते. दरम्यान, यावर आता अदानी समूहानं स्पष्टीकरण देत ती वृत्त चुकीची असल्याचं म्हटलं आहे. अदानी ग्रीन एनर्जीनं कंपनीचं संचालक गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (एफसीपीए) अंतर्गत लाचखोरीचे आरोप केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. अशी विधानं पूर्णपणे खोटी असल्याचं कंपनीनं म्हटलंय.
अदानी ग्रीन एनर्जीच्या म्हणण्यानुसार, गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस डीओजेच्या दोषारोपपत्रात एफसीपीएचे उल्लंघन केल्याचा किंवा यूएस एसईसीच्या दिवाणी तक्रारीत नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. अदानी ग्रीन एनर्जीनं बुधवारी, २७ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात दाखल केलेल्या रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
गौतम अदानींवर आरोप नाहीत
गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील न्याय विभागाच्या फॉरेन करप्शन प्रॅक्टिस अॅक्टनुसार लाचखोरीचा कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही, असं अदानी समूहानं म्हटलंय. केवळ Azure आणि CDPQ च्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप आहेत. अदानी ग्रीन एनर्जीच्या म्हणण्यानुसार, अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचं वृत्त पूर्णपणे खोटं आहे.
FCPA च्या उल्लंघनाचे आरोप नाहीत
अदानी ग्रीन एनर्जीनं आपल्या फायलिंगमध्ये अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांवरील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताचं खंडन केलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आमचे संचालक गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्टचे (एफसीपीए) उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. 'गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस डीओजेच्या आरोपपत्रात किंवा यूएस एसईसीच्या दिवाणी तक्रारीत नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये एफसीपीएचे कोणतेही उल्लंघन केल्याचा आरोप नाही.' असं अदानी ग्रीन एनर्जीनं म्हटलंय.