Join us  

IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 1:19 PM

एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंडिगो (Indigo) फ्लाइटने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला तिकिटासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. दरम्यान, विमान कंपनीने गुरुवारी इंधन शुल्क (Fuel Charge) हटवण्याची घोषणा केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या मते, हा निर्णय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गासाठी 4 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे.

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील एक प्रमुख असलेल्या एअरलाइन्स इंडिगो कंपनीने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंडिगो एअरलाइन्सला इंधन अधिभार हटवण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा अधिभार आजपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू झाला आहे. एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर इंडिगोने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन अधिभार लागू केला होता. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. एअरलाइन्सच्या प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार, हा इंधन अधिभार भरावा लागत होता, परंतु आता त्यांची या शुल्कातून सुटका झाली आहे. आता इंधन अधिभार हटवल्यानंतर इंडिगो फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट स्वस्त होऊ शकते.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन अधिभार लागू करताना इंडिगोने सांगितले होते की, विमान प्रवासाच्या अंतरानुसार इंधन शुल्क 300 ते 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, एटीएफच्या किमतींचा थेट परिणाम भाड्यांवर दिसून येतो. खरंतर, कोणत्याही विमान कंपनीच्या परिचालन खर्चापैकी सुमारे 40 टक्के एटीएफचा वाटा असतो.

सगल तीन महिन्यांपासून होतेय कपातएटीएफच्या किमतीत झालेल्या घसरणीबद्दल सांगायचे तर, नुकतेच 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एटीएफच्या किमती कमी केल्या होत्या. IOCL च्या वेबसाइटनुसार, राजधानी दिल्लीत एटीएफमध्ये 4 टक्के कपात करण्यात आली होती. त्यानंतर एटीएफची किंमत प्रति किलोलिटर 4,162.50 रुपयांनी कमी होऊन 1,01,993.17 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. नोव्हेंबर 2023 पासून तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किमतीत केलेली ही सलग तिसरी कपात होती.

एटीएफच्या किमती कमी होण्याचा परिणामएटीएफच्या किमती कमी करण्याच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या निर्णयाचा दिलासादायक परिणाम आता दिसू लागला आहे आणि इंडिगो एअरलाइन्सने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. या तीन महिन्यांत कंपन्यांनी केलेल्या कपातीमुळे विमान इंधनाच्या किमतीत प्रति किलोलिटर  16,206 रुपयांची घट झाली आहे. जर आपण दिल्ली व्यतिरिक्त इतर महानगरांबद्दल बोललो तर ते कोलकातामध्ये 1,10,962.83 रुपये प्रति किलोलिटर, मुंबईमध्ये 95,372.43 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,06,042.99 रुपये प्रति किलोलिटर झाले आहे.

टॅग्स :इंडिगोव्यवसायविमान