नवी दिल्ली : देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने महिला प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. यानुसार, वेब चेक-इन दरम्यान सीट निवडताना महिला प्रवाशांना आता इतर महिलांनी कोणती सीट आधीच बुक केली आहे, ते पाहू येणार आहे. त्यानुसार त्या आपली सीट निवडू शकतात. म्हणजेच, जर एखाद्या महिला प्रवाशाला दुसऱ्या महिलेच्या शेजारी आपली सीट हवी असेल तर तिला आता तसे करण्याचा पर्याय मिळणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मार्केट रिसर्चनंतर ही सेवा सुरू करण्यात आल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे. तसेच, महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक व्हावा, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हा एक चांगला उपक्रम आहे, विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी, ज्यामुळे त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या महिलेने घेतलेल्या सीटच्या शेजारी जागा बुक करता येते, असे एअरलाइन्सचे म्हणणे आहे.
इंडिगो 'सुपर सेव्हर सेल'
इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर एक शानदार सेलची घोषणा केली आहे. ज्यामध्ये सर्व शुल्कांसह भाडे ११९९ रुपयांपासून सुरू होते. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यानच्या प्रवासासाठी ही विक्री २९ मे ते ३१ मे २०२४ पर्यंत आहे. ग्राहक पसंतीच्या सीट सिलेक्शन शुल्कावर २० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत घेऊ शकतात.