Join us

Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:14 AM

Indigo Flight: तुम्ही यापूर्वी रेल्वेनं कधी ना कधी प्रवास केलाच असेल. अनेकदा रेल्वेमध्ये कन्फर्म बर्थवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच काही आरएसी आणि वेटिंग तिकीट असलेले प्रवासीही चढवले जातात. आता असाच काहीसा किस्सा विमानातही झालाय.

तुम्ही यापूर्वी रेल्वेनं कधी ना कधी प्रवास केलाच असेल. अनेकदा रेल्वेमध्ये कन्फर्म बर्थवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच काही आरएसी आणि वेटिंग तिकीट असलेले प्रवासीही चढवले जातात. कन्फर्म बर्थ असलेल्या प्रवाशाची गाडी चुकली तर बर्थ आरएसी किंवा वेटिंग लिस्टेड प्रवाशाला दिला जाईल, या आशेनं असे प्रवासी ट्रेनमध्ये चढतात. ट्रेनमध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा ट्रेंड आपण पाहिला आहे. आता विमानांमध्येही अशा प्रकारचं काम केलं जात आहे. होय, देशातील विमानांच्या संख्येच्या बाबतीत नंबर वन एअरलाइन्स असलेल्या इंडिगोनं हे केलंय. 

काय आहे प्रकरण? 

मुंबई विमानतळावर ही घटना घडली. मंगळवारी मुंबईहून वाराणसीला जाणारं विमान क्रमांक ६ ई ६५४३ विमानतळावरून उड्डाणासाठी तयार होतं. तेव्हा क्रू मेंबर्सना समजलं की, विमानात सीटच्या संख्येपेक्षा एक जास्त प्रवासी आहे. यानंतर क्रू ला काही समजेना. त्यांनी तपासणी केली असता स्टँडबाय प्रवाशाला बोर्डिंग पास देण्यात आल्याचं निदर्शनास आलं. कन्फर्म प्रवाशाला जो सीट नंबर देण्यात आला होता, तोच सीट नंबर त्यांना देण्यात आला होता. 

मग काय झालं? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान वेळेवर टेक ऑफ करणार होतं. पण सीट न मिळाल्यानं त्या स्टँडबाय प्रवाशानं स्वत:साठी सीट मागितली. या प्रकरणात विमानाच्या उड्डाणालाही विलंब झाला. पण नंतर त्या स्टँडबाय प्रवाशाला उतरवण्यात आलं. स्टँडबाय प्रवाशांना तिकीट देणे या उद्योगात नवीन नाही, असं विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. साधारणपणे सीट रिकामी असल्यास उड्डाण करू शकणाऱ्या एअरलाईन्स कर्मचाऱ्याला स्टँडबाय पॅसेंजर म्हणतात. 

इंडिगोनं काय म्हटलं? 

इंडिगोनं या घडलेल्या प्रकाराबाबत एक निवेदन जारी केलं. मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या विमान क्रमांक ६ ई ६५४३ च्या प्रवासी चढण्याच्या प्रक्रियेदरम्यान चूक झाली. यामध्ये स्टँडबाय असलेल्या प्रवाशाला कन्फर्म प्रवाशासाठी राखीव जागा देण्यात आली होती. उड्डाणापूर्वी ही चूक लक्षात आली आणि स्टँडबाय असलेल्या प्रवाशाला खाली उतरवण्यात आले असं एअरलाइन्सनं म्हटलंय. आपल्या ऑपरेशनल प्रोसेस मजबूत करण्यासाठी सर्व उपाय करणार असल्याचंही इंडिगोनं यानंतर म्हटलं.

टॅग्स :इंडिगोरेल्वे