भारतातील लो कॉस्ट एअरलाइन्स इंडिगो एअरबसला ५०० विमानांची ऑर्डर देण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत इंडिगोच्या a320 च्या ४७७ विमानांची डिलिव्हरी एअरबसकडे प्रलंबित आहे. भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन्स इंडिगोच्या बोर्डाची बैठक पार पडणार आहे. इंडिगोच्या बोर्डाच्या या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
इंडिगो आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ५०० एअरबसची ऑर्डर देऊ शकते. या ऑर्डरची एकूण किंमत ५०० अब्ज डॉलर्स किंवा ४१ लाख कोटींपेक्षा जास्त असू शकते. दरम्यान, एवढ्या मोठ्या ऑर्डरवर विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सूट मिळते. इंडिगोनं Airbus A320 नियो फॅमिली विमानाची ऑर्डर दिली आहे.
एअरबस पॅरिस एअर शोमध्ये यासंबंधीची घोषणा करू शकते, अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिली. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. एअरबस पॅरिस एअर शोच्या ग्रँड एन्ट्रीसाठी तयारी करत आहे. एअर शोच्या पहिल्या दिवशी कंपनी इंडिगोसोबतच्या ५०० एअरक्राफ्टच्या कराराबद्दल घोषणा करू शकते.
सर्वात मोठी ऑर्डर
इंडिगोची ही ऑर्डर एव्हिएशनच्या इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर ठरू शकते. इंडिगोकडे २०३० पर्यंत a320 फॅमिलीच्या ४७७ विमानांची डिलिव्हरी बाकी आहे. या ऑर्डरमुळे पुढील दशकात इंडिगोला नवीन विमानांचा पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील याची खात्री होण्यास मदत मिळणार आहे.