मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ अशी ओळख असेलल्या मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विमान कंपन्यांनी आपल्या सेवांत कपात करण्याची सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर आता इंडिगो कंपनीने आगामी काळात त्यांच्या ताफ्यातील ६ ते १२ विमानांचे मुंबई विमानतळावरून होणारे उड्डाण रद्द करण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे, तर इंडिगोप्रमाणे अन्य कंपन्यांनीही मुंबईतून विमान उड्डाण कमी करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
विमानसेवेत कपात करण्याचे नियोजन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या ३० मार्चपासून सुरू होणार आहे. एअर इंडिया समूहातील १७ विमाने रद्द होणार असल्याची माहिती आहे, तर अकासा कंपनीनेदेखील मुंबई ते बंगळुरू व बंगळुरू ते मुंबई अशा दोन विमानांचे उड्डाण रद्द करणार असल्याचे नियोजन केले आहे.
मुंबई विमानतळावर दिवसाकाठी ९५० च्या आसपास विमानांची ये-जा होते. गेल्यावर्षी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येने विक्रमी टप्पा पार करतानाच प्रवासी संख्येनेही चार कोटींचा टप्पा पार केला आहे.