मुंबई- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोनं 10 लाख जागांसाठी विशेष ऑफर दिली आहे. याअंतर्गत तिकीट बुकिंगची किंमत 999 रुपयांपासून सुरू होणार आहे. मर्यादित काळासाठी असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला 999 रुपयांत हवाई सफर करता येणार आहे. या 999 रुपयांमध्ये ग्राहक कुठेही यात्रा करू शकतो.
मोबाईल वॉलेट मोबिक्विकच्या माध्यमातूनही तुम्ही तिकीट खरेदी करू शकता. तसेच कंपनी ग्राहकांना 600 रुपयांपर्यंत म्हणजे 20 टक्के कॅशबॅकही देते. इंडिगोची ही ऑफर सोमवारी 3 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत तुम्ही 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019पर्यंत प्रवास करू शकणार आहात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले, आम्ही चार दिवसांची ऑफर उपलब्ध करून दिली आहे. यात ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये कधीही प्रवास करू शकणार आहे. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. या ऑफरअंतर्गत 12 लाख जागा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीही इंडिगोनं अशी ऑफर दिली होती.
स्वस्तात विमानसेवा उपलब्ध करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्स कंपनीला 12 वर्षे पूर्ण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी खास ऑफर दिली होती. इंडिगोकडून 12व्या वर्धापन दिनानिमित्त एका योजनेअंतर्गत तब्बल 12 लाख सीट्स बुकिंग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या 6 ई नेटवर्कवरून ही ऑफर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या योजनेत आंतरराष्ट्रीय प्रवासाचाही समावेश आहे. इंडिगोचे प्रमुख अधिकारी विल्यम बोल्टर यांनी याबाबत म्हटले होते की, भारतीय एअरलाईन्सच्या सीट्सची सर्वात मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. 4 ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस संस्मरणीय ठेवण्यासाठी आम्ही ही घोषणा केली. देशातील 57 शहरांतील नेटवर्कद्वारे हे 12 लाख सीट्सचे बुकींग होणार आहे. दरम्यान, या बुकींगसाठी कमीत-कमी 3000 रुपयांचे तिकीट खरेदी केल्यास आणि भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यानं प्रवाशांना 5 टक्के डिस्काऊंटही मिळालं होतं.