नवी दिल्ली - पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी आपल्या सीईओपदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल 12 वर्षे पेप्सिको कंपनीसाठी काम केल्यानंतर नुयी यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने बिझनेस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पेप्सिको ही जगातील प्रमुख ब्रीवरेज कंपनी आहे. इंद्रा नुयी यांनी 2006 साली कंपनीच्या सीईओपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर, कंपनीचा आर्थिक व्यवहार वाढविण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.
इंद्रा नुयी यांच्या रुपाने पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे इंद्रा नुयी या भारतीय असल्याने भारतासाठी ही सर्वात अभिमानाची बाब होती. कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिल्यानंतर नुयी या ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या सेवेतून मुक्त होणार आहेत. पेप्सिको सध्या मजबूत स्थितीत असून पेप्सिकोचे अच्छे दिन येणार असल्याचेही नुयी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. इंद्रा नुयी यांचा जन्म 1955 साली चेन्नईत झाला होता. त्यांचे वडिल स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये नोकरीला होते. आयआयएम कोलकाता येथून त्यांनी आपला मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. तर सन 2001 मध्ये सीएफओ म्हणून पेप्सिको कंपनीत कामाला सुरुवात केली होती. इंद्रा नुयी यांनी रुजू होण्यापासून ते आजपर्यंत, कंपनीच्या नफ्यात 2.7 बिलियन्स डॉलर्सने वाढ होऊन तो 6.5 बिलियन्स डॉलरपर्यंत पोहोचला आहे.