Join us

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; अदानी, रामदेव बाबा आणखी श्रीमंत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 2:57 PM

आधीच महागाई, त्यात सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री; अदानी, रामदेव बाबा कमाई करणार

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढत आहे. इंधनाचे दर वाढल्यानं सगळ्याच वस्तूंचे भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. आजपासून खाद्यतेलांच्या किमती आणखी वाढणार आहेत. कारण इंडोनेशियानं पामतेलाची निर्यात बंद केली आहे. या निर्णयाचा फटका भारताला बसणार आहे.

भारत खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. आपल्या गरजेच्या ५० ते ६० टक्के तेल भारताला आयात करावं लागतं. भारताच्या आवश्यकतेपैकी ५० टक्के पाम तेल इंडोनेशिया पुरवतो. मात्र इंडोनेशियामध्ये तेलाच्या किमती वाढल्यानं तिथल्या सरकारनं निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. रशिया, युक्रेनचा समावेश सूर्यफूल आणि सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये होतो.

पाम तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्यानं देशात तेलाच्या किमती वाढणार आहेत. खाद्य तेल बाजारावर अदानी विल्मार आणि रुची सोया यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. खाद्य तेलांच्या किमतीत वाढ झाल्याचा फायदा या दोन्ही कंपन्यांना होईल. 

अदानी विल्मारच्या शेअरची किमती गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या ५ दिवसांत शेअरची किंमत २५ टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारी अदानी विल्मारचा शेअरचा दर ५ टक्क्यांनी वाढला आणि त्याची किंमत ८४३.३० रुपयांवर पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून रुची सोयाच्या शेअरची किंमतही वाढत आहे. बुधवारी कंपनीच्या शेअरचं मूल्य ७ टक्क्यांनी वाढून ११०४ रुपयांवर पोहोचलं. गेल्या ५ दिवसांत शेअरची किंमत १६ टक्क्यांनी वाढली आहे.

टॅग्स :अदानी