नवी दिल्ली : तुमच्या बँकेने तुम्हाला न विचारता कर्ज मंजूर केले तर कसे होईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात कधी येतील, याचा विचार तुम्ही क्वचितच करू शकता. पण प्रत्यक्षातही असेच काहीसे घडले आहे. खरंतर, देशातील सर्वात मोठी बँक इंडसइंड (Indusind Bank) बँकेने तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहकांना मंजुरीशिवाय कर्ज मिळण्याची वस्तुस्थिती स्वीकारली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकट काळात सहयोगीद्वारे मायक्रो फायनान्स कर्जाचे (Micro Loans) वितरण 'तांत्रिक त्रुटी'मुळे झाले होते, असे म्हटले आहे. डेलॉयट (Deloitte) या ऑडिट कंपनीच्या तपासातही यासंबंधीचे तथ्य समोर आले आहे.
ही त्रुटी समोर आल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीचे मूल्यांकन करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. याची माहिती इंडसइंड बँकेकडून शेअर बाजाराला देण्यात आली. हे प्रकरण इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडने (BFIL) मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान ग्राहकांना त्यांची मंजुरी न घेता मायक्रो फायनान्स कर्ज वाटप केल्याच्या आरोपांशी संबंधित आहे.
तक्रार आल्यानंतर बँकेने तत्काळ इंटरनल ऑडिट, आयटी ऑडिट करणे अशी पावले उचलली. यानंतर तपासाची जबाबदारी फॅक्ट ऑडिट कंपनी डेलॉयटकडे देण्यात आली. बँकेने सांगितले की, डेलॉयटने 7 मार्च 2022 रोजी अंतिम अहवाल सादर केला आणि या अहवालातील निष्कर्ष आणि मूल्यांकनाच्या आधारे, बँकेच्या संचालक मंडळाला असे आढळून आले की, ग्राहकांना मंजुरीशिवाय कर्ज वाटप तांत्रिक त्रुटीमुळे झाले होते.