Join us  

नोटाबंदीतही औद्योगिक उत्पादनात 5.7 टक्क्यांनी वाढ

By admin | Published: January 13, 2017 8:56 AM

नोव्हेंबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात 5.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ ही गेल्या 13 महिन्यातील उच्चांक आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था विकासाला खीळ लागल्याचे आरोप चुकीचे ठरत आहेत. कारण नोव्हेंबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात 5.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 1.9 टक्के होता. औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ ही गेल्या 13 महिन्यातील उच्चांक आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच नोटाबंदीचा निर्णय घेत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 
 
गुरुवारी यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार मुख्यत: भांडवली वस्तूंच्या उत्पादनामुळे हा नफा झाला आहे. इतकंच नाही तर महागाईच्या बाबतीतही सरकारला दिलासा मिळाला असून डिसेंबर महिन्यात 3.63 टक्क्यांवर असणारी महागाई कमी झाली असून 3.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. 
 
गेल्या दोन वर्षातील ग्राहक किंमत निर्देशांकमधील हा निच्चांक आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती कमी असणं याचं मुख्य कारण आहे. 
 
उत्पादन वाढीतही नफा झाल्याचं दिसत असून वजा 2.4 टक्क्यांवरुन 5.5 टक्के झाली आहे. मुलभूत वस्तू वाढ 4.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. डाळींचा महागाई दर 0.23 टक्क्यांनी कमी झाला आहे. कपडे, बूट यांची महागाई 4.98 टक्क्यांवरुन घसरुन 4.88 वर आली आहे. मात्र इंधन महागाई दर वाढला असून 2.80 टक्क्यांवरुन 3.77 टक्के झाला आहे.