बंगळुरू : सप्टेंबरमध्ये भारतातील कारखाना उत्पादनाचा वृद्धीदर आठ वर्षांतील उच्चांकावर गेला असल्याचे एका खासगी सर्वेक्षणात आढळून आले आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे मागणी आणि उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कारखाना उत्पादनास लाभ झाला आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
१९७९ नंतर यंदा पहिल्यांदाच भारताचा वृद्धीदर संपूर्ण वर्षात नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा महत्त्वपूर्ण आहे. आयएचएस मार्किटकडून जारी केल्या जाणारा ‘निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) सप्टेंबरमध्ये वाढून ५६.८ अंकांवर गेला. आॅगस्टमध्ये तो ५२.० अंकावर होता. जानेवारी २०१२ नंतरचा हा सर्वाधिक पीएमआय आहे. ५० अंकावरील पीएमआय वृद्धी दर्शवितो.उत्पादनाची नोंद घेणाऱ्या उप-निर्देशांकाने डिसेंबर २००७ नंतरची सर्वांत मोठी झेप घेतली आहे. नव्या आॅर्डर्सचा विस्तार फेब्रुवारी २०१२ नंतर सर्वाधिक वेगाने होत आहे. देशांतर्गत आणि विदेशी मागणी सात महिन्यांत पहिल्यांदाच वाढली असून, त्याचा लाभ नव्या आॅर्डर्सच्या रूपाने उत्पादकांना होत आहे. सप्टेंबरमध्ये कच्च्या मालाच्या किमतींतील वाढ मंदावल्याचे दिसून आले. तरीही उत्पादकांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविल्या आहेत.औद्योगिक क्षेत्राची वाटचाल प्रगतीकडेआयएचएस मार्किटच्या आर्थिक सहसंचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, भारताचे वस्तू उत्पादन क्षेत्र योग्य दिशेने चालले आहे. सप्टेंबरमधील पीएमआयच्या आकड्यांत उत्तम सुधारणा हे त्याचेच लक्षण आहे. कोविड-१९ लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे कारखान्यांतील उत्पादन जोरात सुरू झाले आहे. नवीन कामांतही मोठी वाढ झाली आहे. कोविड-१९ साथीबाबत अजून अनिश्चितता कायम असली तरी उत्पादक मात्र सुधारणेचा आनंद लुटत आहेत.