Join us

Keshub Mahindra : उद्योगपती केशब महिंद्रा यांचं निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आनंद महिंद्रांशी होतं खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:35 PM

Keshub Mahindra Death: भारतातील सर्वात वयस्कर उद्योगपती आणि अब्जाधीश तसे महिंद्रा अँड महिंद्रा एमेरिट्सचे चेअरमन केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते.

भारतातील सर्वात वयस्कर उद्योगपती आणि अब्जाधीश तसे महिंद्रा अँड महिंद्रा एमेरिट्सचे चेअरमन केशब महिंद्रा यांचं आज निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या २०२३ मधील अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा भारतातील १६ नव्या अब्जाधिशांमध्ये समावेश करण्यात आला होता. ते आपल्या पश्चात १.२ अब्ज डॉलर एवढी संपत्ती सोडून गेले आहेत. सुमारे ४८ वर्षे महिंद्रा ग्रुपचं नेतृत्व केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी चेअरमनपद सोडलं होतं.

दिवंगत केशब महिंद्रा यांनी १९४७ मध्ये त्यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर १९६३ मध्ये त्यांना महिंद्रा ग्रुपचं चेअरमन बनवण्यात आलं होतं. केशब महिंद्रा उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका होते. तसेच आतापर्यंत महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन एमेरिट्स होते. सन २०१२ मध्ये ते ग्रुप चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

केशब महिंद्रा यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२३ मध्ये सिमला येथे झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कॉर्पोरेट जगतामध्ये शोकाचं वातावरण आहे. वयाचं शतक पूर्ण करण्यासाठी काही महिने शिल्लक असतानाच त्यांनी अब्जाधीशांच्या यादीत पुनरागमन केलं होतं. त्यामुळे ते चर्चेच होते. केशब महिंद्रा यांनी अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया विद्यापीठामधून पदवी मिळवली होती. १९६३ मध्ये महिंद्रा ग्रुपचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी कंपनीला नव्या उंचीवर पोहोचवलं आहे.

आपल्या कार्यकाळादरम्यान केशब महिंद्रा यांचं लक्ष युटिलिटीशी संबंधित वाहनांची निर्मितीमध्ये वाढ करणे आणि त्यांची विक्री वाढवण्यावर होते. विलीज-जीपला वेगळी ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. वयाच्या ९९ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या केशब महिंद्रा यांनी टाटा स्टिल, टाटा केमिकल्स, आयसीआयसीआयस आयएफसी, स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि इंडियन हॉटेल्ससारख्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ कौन्सिलमध्ये काम केलं आहे.   

टॅग्स :व्यवसायभारत