लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महागाईचे सर्वसामान्यांना झटक्यावर झटके बसणे सुरू झाले आहे. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांपासून ते तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने ८ वर्षातील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई मार्चमध्ये वाढून ८.७९ टक्के झाली आहे. खाद्यपदार्थांची महागाई ८.३८ टक्के झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर पहिल्या तिमाहीत महागाईचा अंदाज ६.३%, दुसऱ्या ५%, तिसऱ्या ५.४ आणि चौथ्या तिमाहीत ५.१% इतका वाढवला होता. मात्र, त्यानंतरही महागाई नियंत्रणात येत नसल्याने आणीबाणीची बैठक बोलवत रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग चौथ्या महिन्यात महागाई दराने रिझर्व्ह बँकेने घालून दिलेली ६ टक्केची मर्यादा ओलांडली आहे.
खरेदी थांबवली
वाढलेल्या महागाईचा भारतातील लोकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम झाल्याचे ‘ईवाय’ने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
८०%
भारतीय हातातील रक्कम खर्च करण्याऐवजी बचत करण्यावर भर देत असून, केवळ परवडणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
औद्योगिक उत्पादनात किरकोळ वाढ
देशातील औद्योगिक उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत १.९ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ही वाढ १.७ टक्के होती. ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी प्रचंड कमी झाली असून, या क्षेत्रात नकारात्मक वाढ दिसून आली आहे. औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असली तरी उत्पादन क्षेत्रात मात्र केवळ ०.९ टक्के वाढ झाली आहे.
अमेरिकेतही ४० वर्षांचा उच्चांक
n महागाईचा फटका सध्या जगभर जाणवत असून, अमेरिकेत गेल्या ७ महिन्यांपासून महागाई रोज नवीन उच्चांक गाठत आहे.
n नवीन आकडेवारीनुसार, अमेरिकेतील महागाई ४० वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
n येथे महागाईचा दर ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
१८.७४ लाख कोटी बुडाले
गुरुवारी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. यामुळे निर्देशांक ५३ हजार, तर निफ्टी १६ अंकांच्या खाली आला आहे. घसरणीच्या या पाच दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे १८.७४ लाख कोटी रुपये बुडाले.