Join us

11 दिवसांत चक्क 6 रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढले, मुंबईत सर्वात महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 9:05 AM

व्हीएम पोर्टफोलिओचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनी एका न्यूज पोर्टला सांगितले की, सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइड ड्युटी प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढविली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांकडून  (OPEC-Organization of the Petroleum Exporting Countries) कच्च्या तेलाचे उत्पादन घटल्यानंतर, या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. देशात गेल्या 11 दिवसांत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 6.02 रुपयांची वाढ झाली आहे. तर, डिझेलचे दरही प्रति लिटरमागे 6.49 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे, लॉकडाउननंतर सर्वसामान्य नागरिकांना आता महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत सर्वाधिक असून प्रति लिटरसाठी 84.15 रुपये द्यावे लागतात. 

ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर, भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 11 दिवसांत पेट्रोल 6.02 रुपयांनी महाग झाले आहे. दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर, अजूनही पॅक केलेल्या पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. तर, देशातील किंमती 21 महिन्यांत सर्वाधिक वाढल्या आहेत.

व्हीएम पोर्टफोलिओचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनी एका न्यूज पोर्टला सांगितले की, सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइड ड्युटी प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढविली आहे. यानंतरही तेल कंपन्यांनी किंमतीवरील कर वाढविला नाही. त्यामुळे आता कंपन्या पेट्रोलच्या किंमती दररोज वाढवत आहेत. याशिवाय लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अचानक पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढ होत आहे. रुपया घसरल्यामुळे तेल कंपन्यांची चिंताही वाढली आहे. लॉकडाउन दरम्यान तेल कंपन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तेल कंपन्या आता ही नुकसान भरपाई करत आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना अगोदरच लॉकडाउनमळे बेकारीचा सामना करावा लागला असून आता महागाईचं संकट समोर उभारले आहे. 

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या अकरा दिवसांत तब्बल 6 रुपयांची वाढ झाली असून राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 55 पैशांनी महागले असून डिझेलच्या किंमतीतही 69 पैशांची वाढ झाली आहे. यात दिल्लीत एक लिटर पेट्रोलची वाढीव किंमत 77 रुपये 28 पैसे झाली आहे. मंगळवारी, 15 जून रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 76.73 रुपये एवढी होती. मुंबईत पेट्रोलची किंमत सर्वाधिक असून ग्राहकांना प्रति लिटरसाठी तब्बल 84.15 रुपये मोजावे लागत आहेत. तर, मुंबईत प्रति 1 लिटर डिझेलची किंमत 74.32 रुपये एवढी आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलमुंबईकोरोना वायरस बातम्या