चिन्मय काळे ।
मुंबई : केंद्र सरकारच्या कंपन्यांनी गेल्या सात दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात २ ते २.५० रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे.आता कच्चे तेल महिनाभरात १० डॉलर प्रति बॅरेलने (१५९ लिटर) महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई ०.३० टक्क्यांनी वाढण्याची भीती स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात महिनाभरात १० बॅरेल प्रति डॉलर वाढ झाल्यास भारताचा आयात खर्च ८ अब्ज डॉलरने (५२,८०० कोटी रुपये) वाढेल. यामुळे जीडीपीमध्ये ०.१६ टक्के घट होईल. जून २०१७ पासून कच्च्या तेलाच्या किमतीत २३ डॉलर प्रति बॅरेलने वाढ झाल्याने महागाई ०.२६ टक्क्यांनी वाढल्याचे बँकेच्या आर्थिक सल्लागारांनी सांगितले.
यूपीएपेक्षा अधिक दर
याआधी यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये आंतरराष्टÑीय बाजारात कच्चे तेल १४१ डॉलरवर असताना राज्याच्या काही भागात पेट्रोल ८५ रुपये प्रति लिटरवर गेले होते. आता मात्र कच्चे तेल ८०-८२ डॉलरदरम्यान असतानाच दर भडकले आहेत. यूपीए सरकारच्या काळात कच्चे तेल ८० डॉलर असताना पेट्रोल ६० व डिझेल ४८ रुपये प्रति लिटरच्या घरात होते.
सरकार उपाय शोधेल
‘वाढत्या इंधन दरांना ओपेक देश कारणीभूत आहेत. पण सरकार गंभीर असून हे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सकारात्मक उपाय शोधून काढेल. त्याबाबत विचार सुरू आहे.’
-धमेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री
78 % कर आणि पुन्हा अधिभार तेलशुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर येणाऱ्या पेट्रोल-डिझेलची किंमत अवघी ३७-३८ रुपये प्रति लिटर असते. त्यावर केंद्र सरकार ५२ टक्के उत्पादन शुल्क लावते. राज्य सरकार महापालिका हद्दीत २६ व पालिका हद्दीबाहेर २४ टक्के व्हॅट आकारते. त्यानंतरही शेतकºयांच्या कर्जमाफीच्या नावाखाली पुन्हा ९ रुपये अधिभार राज्य सरकार सर्वसामान्यांच्या खिषातून वसूल करते.
पेट्रोल-डिझेलमुळे महागाईचा भडका
महागाई वाढणार ०.३० टक्क्यांनी : बॅरलचा दर १० डॉलरने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:16 AM2018-05-22T00:16:46+5:302018-05-22T00:16:46+5:30