नवी दिल्ली : फेब्रुवारीत सरकारी कागदोपत्री ठोक महागाईचा दर उणे २.0६ टक्क्यांवर आला आहे. खाद्य वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे महागाईचा पारा शून्याखाली गेल्याचे सांगण्यात आले.
ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जानेवारीत उणे 0.३९ टक्के, डिसेंबरमध्ये उणे 0.५0 टक्के आणि नोव्हेंबरमध्ये उणे 0.१७ टक्के होता. २0१४च्या फेब्रुवारीमध्ये तो ५.0३ टक्क्यांवर होता.
अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात खाद्यवस्तूंची महागाई ७.७४ टक्के, तर उत्पादित वस्तूंची महागाई 0.३३ टक्क्यांवर होती. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई उणे १४.७२ टक्क्यांवर घसरली होती.
खाद्यवस्तूंपैकी अंडी, मांस, मासळी यासारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांची महागाई वाढलेली दिसून आली. ही महागाई १.२७ टक्क्यांवर होती. या उलट भाजीपाला, फळे, दूध इ. शेती उत्पादनांची महागाई मात्र घटली. भाजीपाल्याचा महागाईचा दर १९.७४ टक्क्यांवरून १५.५४ टक्क्यांवर आला. बटाट्याची महागाई २.११ टक्क्यांवरून उणे ३.५६ टक्क्यांवर आली. कांद्याच्या महागाईचा दर मात्र उणे १.९0 टक्क्यांवरून तब्बल २६.५८ टक्क्यांवर गेला आहे. भाजीपाल्यांत कांदा सर्वाधिक महागला आहे.
बिगर अन्न वस्तूंची महागाई उणे ५.५५ टक्क्यांवर घसरली आहे.
महागाईचा दर आता विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्याची मागणी औद्योगिक क्षेत्राकडून होत आहे. फिक्कीने म्हटले की, या आधी रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केली आहे. या कपातीचा लाभ ग्राहकांना मिळेल याची खबरदारी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने घ्यायला हवी. असोचेमने म्हटले की, या परिस्थितीत औद्योगिक आणि ग्राहक मागणी वाढण्यासाठी तात्काळ उपाय योजण्याची गरज निर्माण झाली आहे. व्याजदर कमी करून कर्जाची सहज उपलब्धता निर्माण करणे याला आता सरकारने प्राधान्य द्यायला हवे.
इक्राच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, येत्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता नाही. ठोक महागाईच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी २0१५ या वर्षात रेपो दरात ५0 बेसिक पॉइंटपेक्षा जास्त कपात होणार नाही, असे आम्हाला वाटते.
४नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका अन्नधान्याच्या उत्पादनास बसल्यास महागाई पुन्हा वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
४ रिझर्व्ह बँकेकडून ७ एप्रिल रोजी पुढील पतधोरण आढावा जाहीर केला जाणार आहे. जानेवारी ते मार्च यादरम्यान रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांत 0.५0 टक्क्यांची कपात केली होती.