नवी दिल्ली : सातत्याने वाढणारा महागाई निर्देशांक आणि घसरते व्याजदर यामुळे देशातील घरगुती गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी कपात झाल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
कोविड-१९ महामारीमुळे देशातील पारिवारिक आर्थिक असुरक्षितता वाढत आहे. कौटुंबिक पातळीवरील बचतीचा चलन, बँक ठेवी, कर्ज रोखे, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, विमा आणि अल्पबचत योजना यांच्याशी थेट संबंध आहे. व्याजदरातील घसरणीमुळे गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. महागाई वाढल्यास परिवाराच्या हातात उरणारी रोख रक्कम कमी होते. त्याचाही थेट परिणाम गुंतवणुकीवर होतो.
सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ७.३४ टक्के होता. सलग सहाव्या महिन्यात तो रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा अधिकराहिला.
एसबीआयच्या मुदत ठेवींचा व्याजदर ४.९ टक्के होता. महागाई-समायोजित वास्तव व्याजदर -२.२७ झालेला आहे. व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात रोख झाल्यामुळे बँकांना व्याजदर कमी करावे लागले आहेत.