लंडन : भारतात किरकोळ महागाई कमी होत नाही. उलट एप्रिलमध्ये या महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्तच राहिला, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.गेल्या काही महिन्यांत महागाईचा दर नियंत्रणात आल्याने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या पतधोरणात त्यांनी व्याजदरात पावटक्का कपात केली होती. महागाईचा दर आणखी कमी झाल्यास पुढील पतधोरणात व्याजदर कपातीला वाव असेल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र एप्रिलमध्ये महागाईचा दर वाढल्याने व्याजदर कमी होण्याच्या आशेला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर राजन यांचे विधान आले आहे. लंडनमधील शिकागो बूथ बिझनेस स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजन म्हणाले की, एक सर्वसाधारण परिस्थितीचा दर कमी होत नाही. आमच्या अपेक्षेपेक्षा हा महागाईचा हा स्तर थोडा जास्तच आहे. महागाई फार प्रमाणात वाढत नाही; पण कमीही होत नाही. लोकांच्या अपेक्षांवर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीतच राहू.जानेवारीनंतर महागाईचा उच्चांक : गुरुवारी महागाईचे सरकारी आकडे जाहीर करण्यात आले. त्यात किरकोळ महागाईचा दर तीन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर म्हणजे ५.३९ टक्क्यांवर पोहोचला. खाद्यपदार्थांचा महागाईचा दरही ६.३२ टक्क्यांवर गेला. यंदा जानेवारीनंतर महागाईचा हा सर्वोच्च स्तर आहे.शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३00.६५ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५.५0 अंकांनी घसरला. एप्रिलमध्ये महागाईचा दर वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीचा सिलसिला थांबविला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत, असे ब्रोकरांनी सांगितले. बीएसई सेन्सेक्स दिवसभर नकारात्मक टापूत होता. एका क्षणी तो २५,४00.२७ अंकांपर्यंत उतरला होता. सत्राच्या अखेरीस ३00.६५ अंकांची अथवा १.१७ टक्क्यांची घसरण नोंदवून २५,४८९.५७ अंकांवर बंद झाला. ६ मेनंतरचा हा सर्वांत कमजोर बंद राहिला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५.५0 अंकांनी अथवा १.0८ टक्क्यांनी घसरून ७,८१४.९0 अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांतही नरमाईचाच कल दिसून आला. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.५८ टक्के आणि 0.२५ टक्के घसरला. जागतिक बाजारांपैकी चीन, हाँगकाँग, जपान आणि सिंगापूर येथील बाजार 0.३१ टक्के ते १.४१ टक्के घसरले. युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजीचे वातावरण होते. फ्रान्स आणि ब्रिटनमधील बाजार 0.६३ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवीत होेते. राजन म्हणाले..भारतीय अर्थव्यवस्थेत हळूहळू सुधारणा होत आहे. ही सुधारणा वेगाने होण्याचेही संकेत आहेत. चांगला पाऊस झाल्यास त्यास गती मिळेल. बँकिंग क्षेत्रातही ताळेबंद बरोबर करण्याचे काम सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘दिवाळखोरी’ विषयक विधेयक संमत झाल्याने बँकांना कर्ज वसुलीचे जास्त अधिकार मिळाले आहेत.
महागाई अपेक्षेपेक्षा जास्त
By admin | Published: May 14, 2016 2:15 AM