नवी दिल्ली : वाढलेली महागाई रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महागाईविरोधातील लढाई दीर्घकाळ चालेल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकेल देवव्रत पात्रा यांनी स्पष्ट केले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पतधोरणात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसायला वेळ लागेल, असेही ते म्हणाले.
पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी लिहिलेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे. लेखात म्हटले आहे की, महागाईविरोधात सुरू असलेल्या लढाईचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदारांत नवीन जोश निर्माण होईल. बाजार आणि जीडीपीला स्थिरता मिळेल. किरकोळ क्षेत्रातील महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईच्या लढाईत आपण यशस्वी झालो, तर भारताची याबाबतीतील स्थिती जागतिक पातळीवर आणखी मजबूत होईल.
५ ते ६ तिमाहींत दिसेल परिणाम - जयंत वर्मा
- आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीचे (एमपीसी) सदस्य जयंत आर. वर्मा यांनी म्हटले की, कठोर पतधोरणाचा परिणाम दिसायला ५ ते ६ तिमाहींचा काळ लागेल.
- आमचे महागाईचे उद्दिष्ट ४ टक्के आहे. त्यात २ टक्के अधिक-उण्यास वाव आहे. रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांनी महागाई नक्कीच कमी होईल. वास्तविक कठोर धोरणांचा परिणाम अजून समोर आलेला नाही. मात्र याचा परिणाम नक्की दिसेल आणि किमतीही कमी होतील.
हरित जीडीपीसाठी स्वतंत्र समितीआरबीआयने बुलेटिनमध्ये हरित जीडीपीसाठी पर्यावरण मंत्रालयानुसार एक समर्पित संस्था निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे. सामाजिक व विकास उद्दिष्टे लक्षात घेता, भारतास आपल्या वित्तीय प्रणालीस हरित वित्त पुरवठ्याच्या दिशेने नेण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.