वॉशिंग्टन : अमेरिकेत महागाईने ४० वर्षांचा उच्चांकी स्तर गाठला असून, १९८२ नंतर महागाई प्रथमच ७.५ टक्क्यांवर गेली आहे. अमेरिकेतील या महागाईचा जगातील सर्वच देशांवर मोठा परिणाम होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या श्रम विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी १९८२ मध्ये महागाईचा दर ७.६ टक्के होता. जानेवारी २०२२ मध्ये महागाईचा दर मागील १२ महिन्यांच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकेतील महागाई वाढण्यामागे पुरवठ्यातील घसरण आणि मागणीत तेजीने होणारी वाढ, ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्हने पतधोरणात सातत्याने फेरबदल केले आहेत. त्यामुळे २०२१ मध्ये महागाईत सात टक्क्यांची वृद्धी झाली आहे, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
स्वयंपाकाचा गॅस घेणेही झाले अवघडकोविड-१९ साथीच्या काळात अमेरिकेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. या काळात महागाई इतकी वाढली की, अमेरिकी लोकसंख्येच्या मोठ्या वर्गास किराणा सामान, स्वयंपाकाचा गॅस, घरभाडे आणि इतर जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. वीजदरांतही मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेत मजुरीच्या दरांतील वाढीने मागील २० वर्षांचा उच्चांक केला आहे. लॉस एंजेलिस आणि इतर काही बंदरावरील हजारो मजूर गेल्या महिन्यात आजारी पडले होते. त्यामुळे मालवाहतूक ठप्प झाली.
भारतावरही होणार परिणामअमेरिकेचे अर्थकारण संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर परिणाम करते. त्यामुळे तेथील महागाईचाही जगभरात परिणाम जाणवेल. भारतातही महागाई वाढेल. वास्तविक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारीच सांगितले होते की, भारतातील महागाई आणखी वाढेल. भारतातील किरकोळ क्षेत्रातील महागाई डिसेंबरमध्ये ५.६ टक्क्यांवर होती.
महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना
- वाढत्या महागाईचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्ह कठोर पावले उचलणार
- फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढीचा निर्णय होणार
- विविध कारणांनी विस्कळीत झालेला वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
- महागाई कमी करण्यासाठी रोजगारांमध्ये वाढ करण्यात येईल, असेही फेडने म्हटले आहे.