Inflation : कोरोनामुळे भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला. अजूनही अनेक देश यातून सावरलेले नाहीत. महागाई वाढत आहेत, यामुळे बेरोजगारीतही वाढ झाली आहे. याच महागाईमुळे अनेकजण नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात आहेत. पीडब्ल्यूसीच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. महागाईमुळे खर्च भागवणे कठीण झाले आहे, अशा स्थितीत कर्मचारी नवीन वाढीव पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत.
PWC च्या रिपोर्टनुसार, जगातील 26 टक्के लोकांना, म्हणजेच एकतृतींश कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून, नवीन काहीतरी करायचे आहे. वाढत्या महागाईमुळे पगारातून घरखर्च आणि ईएमआय भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकजण नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत.
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणार
पीडब्ल्यूसीच्या रिपोर्टमध्ये ब्रिटनचे उदाहरण देताना असे म्हटले आहे की, तेथील 47 टक्के कर्मचाऱ्यांनी महिनाअखेरीस काहीच बचत होत नसल्याचे सांगितले आहे, तर 15 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना घर खर्चाला पैसे उरत नाहीत. त्यामुळे नोकरी सोडून दुसरं काही काम करण्याशिवाय, त्यांच्याकडे पर्याय नाही.
दरम्यान, या विषयावरील तज्ञांचे म्हणणे आहे की, तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे लोक बदल करण्यास घाबरतात. पगारातून खर्च भागवता येत नसतानाही नवीन नोकरीत यशाची शाश्वती नसल्याने नोकरी सोडण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. 2008 च्या मंदीच्या काळात अमेरिकेत 26 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात नोकऱ्या बदलणाऱ्यांची संख्या अमेरिकेच्या इतिहासात सर्वात कमी होती.
भारतालाही फटका बसणार
जगात हरित ऊर्जेच्या विकासाबरोबर नोकऱ्याही कमी होतील, अशी भीती आहे. चीन आणि भारतातील मोठी लोकसंख्या खाण उद्योगात काम करते. यामुळे 2035 पर्यंत एकट्या कोळसा उद्योगात 4 लाख नोकर्या नष्ट होतील, म्हणजेच जगात दररोज 100 लोक बेरोजगार होतील. पण त्याचा सर्वाधिक परिणाम भारत आणि चीनवर होणार आहे. अमेरिकेच्या ग्लोबल एनर्जी मॉनिटरच्या अहवालानुसार, शतकाच्या मध्यापर्यंत कोल इंडियामध्ये 73 हजार 800 नोकऱ्या गमावल्या जातील, तर 37 टक्के कोळसा उद्योग कमी करावा लागेल.