नवी दिल्ली - ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आदी ठिकाणी अन्न महाग होऊ शकते. (Inflation LPG price hike first day of October month commercial cylinder expensive)
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी ही किंमत 1770.5 रुपये एवढी होती. महत्वाचे म्हणजे, पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेत असतात.
घरातील स्वयंपाकाच्या गॅसवर दिलासा -
यापूर्वी 1 सप्टेंबरला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवून 884.50 रुपये करण्यात आली. या महिन्यात या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सामान्य जनतेसाठी ही थोडीफार दिलासा देणारी बाब आहे.
CNGच्या किंमती वाढण्याची शक्यता -
तत्पूर्वी, गुरुवारी सायंकाळी सरकारने नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 62 टक्के वाढ जाहीर केली आहे. नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.