Join us

Petrol-Diesel Price Cut: महागाई की निवडणुकांची पूर्वतयारी? केंद्राचा पेट्रोल, डिझेलवरील कर 5, 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 6:45 AM

दिवाळी बंपर! डिझेल 10 तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचे आवाहन; शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिवाळीतील नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले आहे. पेट्रोलडिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

इंधनाच्या दरवाढीमुळे संतप्त झालेले देशवासीय आणि रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकरी यांना मोदी सरकारने एका अर्थाने मोठीच भेट दिली आहे. इंधनाचे कमी झालेले नवे दर गुरुवारपासून देशभर लागू होणार आहेत. या इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करावा, असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्यांना केले आहे. तसे झाल्यास इंधन आणखी स्वस्त मिळू शकेल. हा शेतकरी, माल व प्रवासी वाहतूकदारांसाठी दिलासा आहे.

केंद्राने पेट्रोलडिझेलवरील अबकारी कराची रक्कम कमी करण्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी घेतला. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर ११५ रुपये ८३ पैसे असून, एक लीटर डिझेलसाठी १०६ रुपये ६२ पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, आता पेट्राेल सुमारे ११० ते १११ रुपये, तर डिझेल ९६ ते ९७ रुपयांदरम्यान मिळू शकेल.

महागाईला बसेल आळादर कमी केल्याने इंधनाची मागणी वाढेल. तसेच महागाईला आळा बसून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. शेतकऱ्यांना पंपासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. पण, ते महागल्याने शेतकरी अडचणीत आले होते. शिवाय मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी दरवाढ सुरू केली होती. परिणामी, भाज्या व अन्नधान्यांचे दर वाढले होते. त्यामुळेच डिझेलचा दर १० रुपयांनी कमी झाला आहे. याउलट पेट्रोलवरील बहुसंख्य वाहने खासगी असल्याने तो दिलासा केवळ ५ रुपयांचाच आहे.

महागाई की निवडणुकांची पूर्वतयारी?केंद्र सरकारने रब्बी पिके आणि सामान्यांना दिलासा ही कारणे दिली असली तरी चार ते पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. निवडणुकांच्या आधी दरवाढ करण्याचे सरकार टाळते वा दर कमी करते. त्यामुळे आताही निवडणुकांमुळे दर कमी केले असावेत, असे दिसते. पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. पाच राज्यांत त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना खूश करण्याचा आणि निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असू शकेल.

टॅग्स :पेट्रोलडिझेल