- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : घाऊक मूल्य निर्देशांकांवर आधारित मे महिन्यातील महागाई दर पाच महिन्यांच्या किमान स्तरावर म्हणजेच २.१७ टक्क्यांवर आला आहे. भाजीपाला, डाळी आणि मांस यांच्या किमती घसरल्याने महागाई दरात घसरण झाली आहे. यामुळे व्याजदर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव येऊ शकतो. डिसेंबरमधील हा दर २.१० टक्के, एप्रिलमधील महागाई दर ३.८५ टक्के होता. तर, मेमधील दर (-)०.९ टक्के होता. डाळी आणि अन्नधान्याच्या किमतींत किंचित वृद्धी दिसून आली. रिझर्व्ह बँकेने या महिन्यात चलनविषयक धोरणाचा आढावा घेतला आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहितील चलनवाढीचा अंदाज कमी करण्यात आला आहे. घाऊक मूल्य निर्देशांक नवे आधार वर्ष २०११-१२वर आधारित आहे. जो २००४-०५ पासून संशोधित करण्यात आला आहे. ज्यामुळे सर्व आर्थिक चित्र अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करता येते. सरकारी आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांच्या किमती वार्षिक आधारावर मे महिन्यात २.२७ टक्क्यांनी घसरल्या आहेत. भाजीपाल्याचे दर १८.५१ टक्क्यांनी कमी झाले आहेत. यात बटाट्याच्या दरात ४४.३६ टक्के घट झाली आहे. तर, कांद्याच्या दरात १२.८६ टक्के घट झाली आहे. अन्नधान्याच्या किमतींत ४.१५ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी याच काळात ६.६७ टक्के घट झाली होती. मे महिन्यात डाळींच्या किमतीत १९.७३ टक्के घट झाली. अंडे, मांस आणि मासे यांच्या दरात वार्षिक १.०२ टक्के घट झाली. या यादीमध्ये एकूण ६९७ वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. यात ११७ जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि विजेशी संबंधित १६ आणि निर्मिती क्षेत्रातील ५६४ वस्तू आहेत. इंधन आणि विजेशी संबंधित उत्पादनात ११.६९ टक्के निर्मिती क्षेत्रात २.५५ टक्के वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंमधील साखरेच्या दरात वाढ झाली आहे. मे महिन्यात साखर, लेदर आणि तंबाखूशी संबंधित उत्पादनातील महागाई वाढ कमी होती. पण, सिमेंट, चुना आणि प्लास्टर, रबर, प्लॅस्टिक वस्तू यांच्या दरात वाढ दिसून आली. चालू वर्षात महागाई दर (एप्रिल-मे)-०.३५ टक्के आहे. तो २०१६-१७मध्ये याच काळात २.५१ टक्के होता. व्याजदर कमी होणार?उद्योग समूह फिक्कीला अशी आशा आहे की, महागाई दर कमी झाल्याने रिझर्व्ह बँक आपल्या चलनविषयक धोरणात या मुद्द्याचा पुनर्विचार करेल. व्याज दरात कपात करण्यास रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढू शकतो.