Join us

जुलैमध्ये महागाई वाढली; सरकारची आकडेवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 1:56 AM

अन्नधान्याच्या किमतींमधील वाढीचा परिणाम

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित अन्नधान्याची चलनवाढही ९.६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.जुलै महिन्यामध्ये देशातील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ६.९३ टक्क्यांवर पोहोचल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये हा दर ६.२३ टक्के होता. त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील अन्नधान्याच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये अन्नधान्याची चलनवाढ ८.७२ टक्क्यांवर होती, ती आता ९.६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये चलनवाढीचा दर चार टक्के राखण्याचा संकल्प जाहीर केला होता. यामध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ वा घट होण्याची अपेक्षाही वर्तविण्यात आली होती.सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला चलनवाढीचा दर मर्यादेमध्ये राखण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी सलग दुसऱ्या महिन्यामध्ये चलनवाढीचा दर हा रिझर्व्ह बॅँकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने आता त्यावर काय केले जाते, याकडे लक्ष लागून आहे.रिझर्व्ह बँकेकडून उपायाची अपेक्षाकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील वस्तूंच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून अन्नधान्य तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. चलनवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आता रिझर्व्ह बॅँकेने उपाय योजावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :महागाई