Join us

सणासुदीच्या काळात बसणार महागाईचा फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 9:10 AM

Inflation in Festive Season : सणासुदीच्या काळात किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून गव्हाचे दर वाढले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात गहू, पीठ आणि तांदूळ यासह स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंच्या सरासरी किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. तसेच, सणासुदीच्या काळात किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून गव्हाचे दर वाढले आहेत. दिल्लीतील घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कमी पुरवठा आणि जास्त मागणी यामुळे गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 2,560 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे यंदा गव्हाचे उत्पादन घटले असून, त्याचा परिणाम कृषी उत्पादनांच्या देशांतर्गत पुरवठ्यावर झाला आहे. किमती सतत वाढत असल्याचे दिल्लीच्या लॉरेन्स रोड मंडीचे जय प्रकाश जिंदाल यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या गव्हाचा भाव 2560 रुपये प्रतिक्विंटल आहे. येत्या काही दिवसांत त्याची सणासुदीच्या हंगामात 2,600 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, 14 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर बाजारभाव जवळपास 2,150 ते 2,175 रुपये प्रति क्विंटलवर चालू होते. या वर्षी उत्पादन कमी असून सरकारने योग्य वेळी निर्यात थांबवली नसल्याचे जय प्रकाश जिंदाल म्हणाले. सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, तोपर्यंत भरपूर गहू निर्यात झाला होता, असे जय प्रकाश जिंदाल यांनी सांगितले.

पिठाची सरासरी किंमत 36.13 रुपये प्रति किलोसरकारी आकडेवारीने सुद्धा गहू, पीठ आणि तांदूळ यांच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये असाच कल दाखवला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, पिठाची सरासरी किरकोळ किंमत 36.13 रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत 38.2 रुपये प्रति किलो आणि गव्हाची शुक्रवारी सरासरी किरकोळ किंमत 31 रुपये होती.

गव्हाच्या दरात 14 ते 15 टक्के वाढ!व्यापाऱ्यांनी सांगितले की, गव्हाच्या दरात जवळपास 14 ते 15 टक्के, तर पिठाच्या दरात सुमारे 18 ते 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच दिल्लीच्या किरकोळ बाजारातील किरकोळ किमतीही सुमारे 7-8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गव्हाच्या किमती वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय मागणी-पुरवठ्याची परिस्थिती, जागतिक वस्तूंच्या किमतीत वाढ आणि युक्रेन आणि रशिया सारख्या प्रमुख गहू निर्यातदार देशांमधील संघर्ष यासारख्या विविध कारणांचा समावेश आहे.

टॅग्स :व्यवसायमहागाई