Join us

ठोक क्षेत्रातील महागाई दीड वर्षाने शून्याच्या वर

By admin | Published: May 17, 2016 4:56 AM

ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर तब्बल १७ महिन्यांनंतर शून्याच्या वर आला आहे

नवी दिल्ली : ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर तब्बल १७ महिन्यांनंतर शून्याच्या वर आला आहे. एप्रिल महिन्यात तो 0.३४ टक्के राहिला. भाज्या आणि डाळींचे भाव वाढल्यामुळे महागाईचा आलेख वर चढला आहे.मार्च महिन्यात ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई शून्याखाली उणे 0.८५ टक्के होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये महागाईचा दर शून्याच्या खाली उणे २.४३ टक्के होता. खाद्य क्षेत्रातील महागाई यंदाच्या एप्रिलमध्ये ४.२३ टक्के, तर मार्चमध्ये ३.७३ टक्के होती. खाद्य क्षेत्रातील महागाई वाढण्यामागे भाज्या आणि डाळींचे वाढलेले दर हे प्रमुख कारण आहे. एप्रिलमध्ये भाज्या २.२१ टक्क्यांनी महागल्या. गेल्या वर्षी हा दर शून्याखाली उणे २.२६ टक्के होता. डाळींचे भाव ३६.३६ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ते ३४.४५ टक्क्यांनी वाढले होते. कांदे आणि फळांच्या किमतीत मात्र घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या भाववाढीचा दर शून्याखाली उणे १८.१८ टक्के, तर फळांच्या भाववाढीचा दर उणे २.३८ टक्के राहिला. किरकोळ क्षेत्रातील महागाई गेल्या आठवड्यातच जारी झाली. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून ५.३९ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ४.८३ टक्के होता.