नवी दिल्ली : एप्रिलमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर ३.१८ टक्क्यांवर गेला. हा चार महिन्यांतील उच्चांक ठरला. पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यामुळे महागाई भडकली आहे. फळे व भाजीपाल्याच्या दरवाढीनेही यात हातभार लावला आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर मार्चमध्ये २.४७ टक्के होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ३.८५ टक्क्यांवर होता. डिसेंबर २0१७पासून महागाईचा दर घसरत होता. एप्रिलमध्ये तो पहिल्यांदाच वाढला आहे. डिसेंबरमध्ये तो ३.५८ टक्के होता. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यवस्तूंचा महागाईचा दर एप्रिल २0१८मध्ये 0.८७ टक्के झाला. आदल्या महिन्यात तो घसरून 0.२९ टक्के झाला. फळांच्या महागाईचा दर दोन अंकी होऊन १९.४७ टक्क्यांवर गेला. मार्चमध्ये तो ९.२६ टक्क्यांवर होता. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाई ७.८५ टक्के झाली. आदल्या महिन्यात ती ४.७0 टक्के होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकताच देशात पेट्रोल-डिझेल महागले. त्यामुळे या क्षेत्राचा महागाई निर्देशांक वर चढला आहे. पेट्रोलचा महागाईचा दर ९.४५ टक्के वाढला. मार्चमध्ये तो अवघा २.५५ टक्के होता. डिझेल १३.0१ टक्के झाले. आदल्या महिन्यात ते ६.१२ टक्के होते.
दरम्यान, फेब्रुवारीमधील घाऊक क्षेत्रातील महागाईची सुधारित आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, फेब्रुवारीतील महागाईचा दर वाढवून २.७४ टक्के करण्यात आला आहे.
घाऊक क्षेत्रातील महागाई चार महिन्यांच्या उच्चांकावर
एप्रिलमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर ३.१८ टक्क्यांवर गेला. हा चार महिन्यांतील उच्चांक ठरला. पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यामुळे महागाई भडकली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:09 AM2018-05-15T05:09:11+5:302018-05-15T05:09:11+5:30