नवी दिल्ली : इराण-इस्रायलयुद्धाकडे जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांत तणाव वाढल्याने भारतात येणाऱ्या मालवाहतुकीचा खर्च जवळपास दुपटीने वाढू शकतो. खनिज तेलाच्या किमती वाढल्याने काही दिवसांनी भारतात महागाईचा भडका उडू शकतो.
पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या घरात पोहोचल्यास अडचणी वाढू शकतात. १९ एप्रिलपर्यंत तेलाचा भाव ८७.३९ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचला होता. भारतीय अभियांत्रिकी निर्यात संवर्धन परिषदेचे (इइपीसी) चेअरमन अरुण कुमार गरोडिया म्हणाले की, युद्धामुळे माल पोहोचण्यात विलंब वाढला आहे. स्टेनलेस स्टील व ॲल्युमिनियम उत्पादन निर्यातदारांच्या व्यापाराला फटका बसू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा भासू लागल्याने देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
देशातील चहा निर्यातदार धास्तावले
इराण भारतीय चहाचा सर्वांत मोठा तिसरा खरेदीदार आहे. इस्रायलसोबत इराणचा संघर्ष वाढल्याने चहा निर्यातदार धास्तावले आहेत. खरेतर मागच्या वर्षीपेक्षा यंदा चांगला व्यापार होईल, अशी अपेक्षा या निर्यातदारांना होती. चहा निर्यात संघाचे चेअरमन अंशुमन कनोरिया म्हणाले, इराण-इस्रायल तणाव न वाढल्यास आसामच्या चहाला असलेली मागणी कायम राहील. तणाव वाढल्यानंतर चहाच्या मागणीला फटका
बसू शकतो.