नवी दिल्ली :
मार्च महिन्यात किरकोळ महागाई कमी होत ५.६६ टक्क्यांवर आली आहे. फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर ६.४४ टक्के होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला महागाईचे लक्ष्य आटोक्यात आणणे शक्य झाल्याचे समोर आले आहे. खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाई कमी झाली आहे.
किरकोळ महागाईचा हा १५ महिन्यांचा नीच्चांक आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये महागाई ४.९१ टक्के आणि डिसेंबर २०२१ मध्ये ५.६६ टक्के राहिली होती. वीज आणि इंधन महागाई ९.९० टक्क्यांवरून ८.९१ टक्क्यांवर आली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ४.७९ टक्के होती. फेब्रुवारीमध्ये हा आकडा ५.९५ टक्के होता आणि वर्षभरापूर्वी याच कालावधीत ७.६८ टक्के होता.
महागाई आणखी कमी होणार?
तृणधान्ये, दूध आणि फळांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर २०२२ मध्ये ५.७ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०२३ मध्ये ६.४ टक्क्यांपर्यंत वाढली होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महागाई ५.२ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्तविला आहे.
औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ
देशातील औद्योगिक उत्पादन यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ५.६ टक्क्यांनी वाढले आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आधारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन फेब्रुवारी २०२२ मध्ये १.२ टक्क्यांनी वाढले आहे. एनएसओच्या आकडेवारीनुसार, यावर्षी फेब्रुवारीमध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ५.३% होते.
कोणत्या वस्तू महागल्या?
दिल्लीत आटा २६ रुपयांवरून ३० रुपये, तर मुंबईत ५२ वरून ५४ रुपये किलोवर पाहोचला आहे. तांदूळ दिल्लीत ३१ रुपयांवरून ३९ रुपये, तर मुंबईत ३९ रुपयांवरून ३६ रुपये किलो झाला आहे. दूध मुंबईत ५१ रुपयांवरून ५८ रुपये लिटर झाले आहे. साखर दिल्लीत ४१ रुपयांवर, तर मुंबईत ४४ रुपयांवर स्थिर आहे.
एका वर्षात ₹१५० महागला गॅस
- मागील एका वर्षात म्हणजेच १० एप्रिल २०२२ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत देशातील स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली आहे. आता गॅस सिलिंडरची किंमत १,१०० रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
- मागील वर्षभरात सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत तूरडाळ १०३ रुपये किलोवरून १२८ रुपये किलो झाली आहे तसेच मुंबईत तूरडाळीचा दर ११० रुपये किलोवरून १३९ रुपये किलो झाला आहे.
पेट्रोलच्या किमती उतरल्या
दूध आणि तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. दिल्लीत पेट्रोल १०५ रुपयांवरून ९६.७२ रुपयांवर, तर डिझेल ९६.६७ रुपयांवरून ८९.६२ रुपयांवर आले आहे.
अमेरिकेलाही दिलासा : अमेरिकेतील महागाईचे आकडेही प्रथमच अपेक्षेपेक्षा खाली असून, महागाईचा ग्राफ प्रत्येक महिन्यात खाली आहे. मे २०२१ मध्ये अमेरिकेत महागाई उच्चांकी स्तरावर पोहोचली होती.