Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका, युरोप आणि चीनचा प्रभाव...

अमेरिका, युरोप आणि चीनचा प्रभाव...

बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीने झालेली पडझड नंतरच्या सकारात्मक वातावरणाने काही प्रमाणात भरून निघाली असली तरी सप्ताहामध्ये निर्देशांक २८ हजारांच्या खाली आला.

By admin | Published: October 17, 2016 05:13 AM2016-10-17T05:13:48+5:302016-10-17T05:57:22+5:30

बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीने झालेली पडझड नंतरच्या सकारात्मक वातावरणाने काही प्रमाणात भरून निघाली असली तरी सप्ताहामध्ये निर्देशांक २८ हजारांच्या खाली आला.

Influence of America, Europe and China ... | अमेरिका, युरोप आणि चीनचा प्रभाव...

अमेरिका, युरोप आणि चीनचा प्रभाव...


अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीने झालेली पडझड नंतरच्या सकारात्मक वातावरणाने काही प्रमाणात भरून निघाली असली तरी सप्ताहामध्ये निर्देशांक २८ हजारांच्या खाली आला. भारत आणि चीनमधील कमी झालेला चलनवाढीचा दर तसेच युरोपच्या बाजारांमधील सकारात्मक वातावरणाने सप्ताहाच्या उत्तरार्धात बाजाराची घसरण थांबविली आहे.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ अतिशय चांगला झाला. दोन दिवस बाजाराला सुटी होती. नंतर मात्र बाजारावर विक्रीचे प्रचंड दडपण येऊन बाजार कोसळला. सप्ताहाच्या अखेरीस पुन्हा बाजाराने सकारात्मक भूमिका घेतली, मात्र सप्ताहाचा विचार करता बाजारामध्ये घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३८७.५४ अंश घसरून २७६७३.६० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११४.२० अंश येऊन ८५८३.४० अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सप्ताहामध्ये वाढ झालेली दिसली.
अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या शक्यतेने बाजारावर विक्रीचे प्रचंड दडपण आल्याने बाजार घसरला. मात्र युरोपामधील सकारात्मक वातावरण तसेच चीनमध्ये कमी झालेली चलनवाढ यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला काहीशी गती प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सप्ताहाअखेरीस बाजार सावरला. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनीही ३५०२ कोटी रुपयांची विक्री केल्याने बाजाराच्या पडझडीमध्ये वाढ झालेली दिसून आली.
चीनमधील चलनवाढ कमी झाल्यामुळे तेथे विकासदर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच चीनची निर्यात घटल्याची चिंता गुंतवणूकदारांना लागली. सप्ताहाच्या उत्तरार्धात जाहीर झालेली भारतातील चलनवाढीची आकडेवारी बाजाराला दिलासा देणारी आहे. अन्नधान्याच्या किमतींमध्ये घट झाली असल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ३.७४ टक्क्यांवरून सप्टेंबर महिन्यात ३.५७ टक्के असा कमी झाला. गेल्या तीन महिन्यांतील हा सर्वांत कमी दर आहे. किरकोळ किमतींवर आधारित चलनवाढीचा दर ४.३१ टक्क्यांवर आला आहे. गेल्या १३ महिन्यांमधील हा नीचांक आहे.
इन्फोसिसने तिमाही निकालात चांगली कामगिरी केली असली तरी महसुली उत्पन्नामध्ये घट होण्याचा व्यक्त केलेला अंदाज गुंतवणूकदारांना काळजीचा वाटल्याने या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
>आठवड्यातील घडामोडी
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये झाली वाढ, बाजारातील किरकोळ विक्रीच्या किमतींवर आधारित चलनवाढ १३ महिन्यांतील नीचांकी, अमेरिकेतील व्याजदरामध्ये वाढ होण्याच्या चिंतेने बाजारात
मोठी विक्री, चीनमधील चलनवाढ कमी झाल्याने जागतिक बाजारांमध्ये समाधानाचे वातावरण, इन्फोसिसने महसूल कमी होण्याचे दिले संकेत.

Web Title: Influence of America, Europe and China ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.