Nvidia Ceo Jensen Huang : सध्या सगळीकडे आर्टिफिशीयल इंटिलिजेन्स अर्थात एआयचा बोलबाला आहे. तुमच्या हातातील मोबाईलपासून शेतातील तंत्रज्ञानापर्यंत सगळीकडे एआयचा वापर होऊ लागला आहे. एआय म्हटलं की एनव्हीडिया कंपनीचे नाव आल्यावाचून राहत नाही. या कंपनीच्या चीपशिवाय एआयचं पानही हलणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या याच कंपनीचे सह-संस्थापक जेन्सेन हुआंग यांना एक प्रश्न विचारल्याने भारतीय युट्यूबर ट्रोल होत आहे.
भारतीय एन्फ्लुएन्सर इशान शर्माने एनव्हीडियाचे सह-संस्थापक जेन्सेन हुआंग यांना एआय आणि हार्डवेअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सल्ला मागितला होता. यावर हुआंग यांनी 'ठकोर परिश्रम' करण्याचा सल्ला दिला होता. या साध्या प्रश्नावरुन इशान शर्मा यांना सोशल मीडियावरुन ट्रोल केलं जात आहे. हुआंग यांची एकूण संपत्ती ९.६ लाख कोटी रुपये आहे. इलॉन मस्क यांच्या इतकीच हुआंग यांचीही ख्याती आहे.
इशान शर्मा यांचे ट्रोलिंग
इशान शर्मा यांनी पाचवी पासचा प्रश्न विचारला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावरुन दिली. तुमच्या इतक्या मोठ्या दिग्गज व्यक्तीला चांगला प्रश्न विचारायला हवा होता, असे अनेकांचे मत आहे. अनेकांनी शर्मा यांची खिल्ली उडवली आहे. या प्रश्नाचं मोठं सिक्रेट उत्तर सांगितलं आहे. आम्हाला आतापर्यंत माहितीच नव्हतं, असंही एका युजरने लिहिलं आहे. आणखी एक लिहितो, तरुण जगातील टॉपच्या सीईओंना भेटला. पण, प्रश्न एकदम फडतूस विचारला.
इशान शर्मा कोण आहे?
इशान शर्मा हा बेंगळुरूमधील असून त्याचे YouTube चॅनल आहे, जिथे तो अपस्किलिंग (नवीन कौशल्ये शिकणे), व्यवसाय आणि AI वर व्हिडिओ अपलोड करतो. याशिवाय तो मार्केटिंग एजन्सीही चालवतो. त्यांनी देशातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेतले असून नंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने त्याच्या YouTube चॅनेलवर आणि मार्केटिंग कंपनीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉलेज सोडले.
जेन्सेन हुआंग कोण आहे?
जेन्सेन हुआंग हे ग्राफिक्स चिप निर्माता एनव्हिडीयाचे सह-संस्थापक आहेत. AI मधील प्रगतीमुळे Nvidia ने गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड यश मिळवलं आहे. एनव्हिडीयाच्या चिप्स बहुतेक AI प्रणालींमध्ये वापरल्या जातात. त्यामुळे गेल्या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती.