Join us

WazirX चे ₹२०००००००००० चोरणाऱ्याची माहिती मिळाली, 'या' हुकुमशाहच्या देशाशी जोडलंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:05 IST

WazirX Breach: गेल्या वर्षी भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून २३५ मिलियन डॉलर (सुमारे २००० कोटी रुपये) चोरणारी व्यक्ती सापडली आहे. पाहा काय आहे हे प्रकरण?

WazirX Breach: गेल्या वर्षी भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून २३५ मिलियन डॉलर (सुमारे २००० कोटी रुपये) चोरणारी व्यक्ती सापडली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या म्हणण्यानुसार यासाठी उत्तर कोरियाचे हॅकर्स जबाबदार आहेत. उत्तर कोरियाला हुकूमशाहचा देश म्हटलं जातं. कारण किम जोंग उन यांच्याकडे उत्तर कोरियाची कमान आहे. हुकूमशाह म्हणून किम जोंग उन यांचं नाव घेतलं जातं.

अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्त निवेदन सादर केलं. यामध्ये उत्तर कोरियात असे अनेक गट आहेत जे जगभरातील क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज, डिजिटल असेट कस्टोडियन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. यामध्ये लाजरस समूहाचाही समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय. सायबर हल्ल्यासाठी उत्तर कोरियातील हॅकर्सला जबाबदार धरणाऱ्या देशांचं हे पहिलं अधिकृत विधान आहे.

काय म्हटलंय निवेदनात?

या हॅकर्समुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा संयुक्त निवेदनात देण्यात आला आहे. वजीरएक्स आणि अन्य ठिकाणांहून चोरलेल्या पैशांचा वापर कथितरित्या उत्तर कोरियाच्या बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी निधी देण्यासाठी जात आहे. क्रिप्टो प्लॅटफॉर्म रेडियंट कॅपिटलमधून पाच कोटी डॉलर्सची चोरी झाल्याप्रकरणी अमेरिका आणि दक्षिण कोरिया सरकारनंही उत्तर कोरियाला जबाबदार धरलं आहे.

काय आहे WazirX प्रकरण?

जुलै २०२४ मध्ये वजीरएक्समध्ये चोरी झाली होती. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवरील हा सर्वात मोठा सायबर हल्ला होता. यामध्ये त्यांच्या मल्टीसिग (मल्टी सिग्नेचर) वॉलेटला टार्गेट करण्यात आलं होतं. हॅकर्सनी प्लॅटफॉर्मच्या अंदाजित रकमेपैकी जवळजवळ निम्मी रक्कम चोरली, ज्यामुळे ठेवी आणि पैसे काढणं थांबलं.

२९ जुलै रोजी इकॉनॉमिक टाईम्सनं वृत्त दिलं होतं की, अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयनं सायबर हल्ल्याचे विश्लेषण करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी वजीरएक्सशी संपर्क साधला होता. वजीरएक्सचे सहसंस्थापक निश्चल शेट्टी यांनी आम्हाला खात्री आहे की हा उत्तर कोरियाचा लाजरस ग्रुप असू शकतो असं म्हटलं होतं.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीअमेरिकाजपान